टेंडर घेणारे लोक हरामखोर, उद्घाटन करणाऱ्याचा दोष काय; PM मोदींच्या माफीवर जरांगेंची प्रतिक्रिया

Manoj Jarange : आमचा अपमान झाला ते झाला, आता माफी मागून काय फायदा असे विधान पीएम मोदी यांच्या माफीनाम्यावर मनोज जरांगे यांनी केले आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविणारा तुरुंगात गेला पाहिजे अशी सुद्धा भूमिका जरांगेंनी घेतली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
मनोज जरांगेंकडून पीएम मोदींची पाठराखण
सोलापूर, इरफान शेख : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला प्रकरणी राजकारण ढवळून निघाले आहे. मराठा आरक्षणाचा लढा उभा करणारे मनोज जरांगे पाटील शनिवारी दुपारी सोलापुरात काही वेळ थांबले होते. मालवण येथे जाताना सोलापुरातील मराठा समाज बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत केले. मनोज जरांगे पाटील यांनी सोलापुरात राजकीय नेत्यांनी सल्ला दिला आहे. महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो , दोघांनी छत्रपतींच्या प्रकरणात राजकारण करू नये असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. छत्रपतीच्या विषयाचे राजकारण केले जात असून सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे देशातील लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण देशाचे दैवत आहेत. उद्घाटन करणाऱ्याचा काय दोष आहे. घटना तर घडली आहे. पंतप्रधान मोदींनी माफी मागितली काय अन् नाही मागितली काय मात्र आमची मानहानी व्हायची ती झाली आहे. मात्र या प्रकरणात जो कोणी दोषी असेल तो आत गेला पाहिजे, असे स्पष्टपणे बोलताना जरांगे पाटील यांनी महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना राजकरण करु नये असा सल्ला सुद्धा दिला आहे.

छत्रपतींवरुन राजकरण नको मनोज जरांगेंचा सल्ला

महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा वापर राजकारणासाठी करू नये. छत्रपती शिवाजी महाराज राज्यातील जनतेच्या अस्मितेचा प्रश्न आहे. महायुती आणि महाविकास आघाडी मधील नेत्यांना खूप जागा आहेत राजकारण करायला. पण अश्या प्रकरणात राजकारण करू नका. सत्ताधारी असो किंवा विरोधक असो या प्रकरणी राजकारण करू नये असा सल्ला मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. याप्रकरणात जो कोणी दोषी असेल तर त्याला कायमचं आत मध्ये टाकलं पाहिजे. सर्वांनी याप्रकरणी राजकारण बंद करा अन्यथा जनतेला तुमच्या विरोधात उठाव करावा लागेल असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.

टेंडर घेणारे लोक हरामखोर

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या टेंडर प्रक्रियेत भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. या मुद्द्यावरही जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे पाटील म्हणाले की, टेंडर घेणारे लोक हे हरामखोर असतात त्यांना कशात काय खावं ते कळत नाही. हे टेंडरवाले लोक महापुरुषांचे पुतळे असतील मंदिर असतील यात पण भ्रष्टाचार करतात खातात. महाविकास आघाडी आणि महायुतीने जर या प्रकरणी राजकारण बंद केले नाही तर आम्हाला मुद्दा हाती घ्यावा लागेल, असा सज्जड दम जरांगे पाटील यांनी भरला आहे.

लेखकाबद्दलप्रतीक्षा बनसोडेपत्रकारिता क्षेत्रातील पाच वर्षाचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सध्या डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी डीडी नॅशनल, लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये रिपोर्टर म्हणून काम केले आहे. झी २४ तासमध्ये डिजीटल टीममध्ये काम केलं आहे. राजकीय आणि सामजिक बातम्या लिहिण्याची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

manoj jarange on modimanoj jarange over chhatrapati shivaji maharajछत्रपती शिवाजी महाराजपीएम मोदीमनोज जरांगेराजकोट किल्लासिंधुदुर्ग छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळला
Comments (0)
Add Comment