Arrest Warrant Against Raj Thackeray: १६ वर्षापूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांनी एसटी बसची तोडफोड आणि जाळपोळ केल्याप्रकरणी निलंगा न्यायालयाने राज ठाकरेंच्या विरोधात अटक वॉरंट जारी केला आहे.
२००८ मध्ये निलंगा येथील मनसे कार्यकर्त्यांनी उदगीर मोडवरती महामंडळाच्या बसगाडीची जाळपोळ केली होती. याप्रकरणी निलंगा पोलिस ठाण्यात आठ जणावर गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये राज ठाकरे यांचा समावेश होता.यापूर्वी निलंगा न्यायालयाने जामीन रद्द केल्याने त्यांना निलंगा येथील न्यायालयात हजर रहावे लागले होते. वकीलांनी राज ठाकरे यांना प्रत्येक तारखेला निलंगा न्यायालयात येणे शक्य नसल्याने हे प्रकरण वर्ग करण्याची विनंती केली होती. त्यावेळी त्यांना जामीनही दिला होता. मात्र तारखेला हजर राहात नसल्यामुळे न्यायालयाने पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक वॉरंट जारी केले आहे.
या प्रकरणातील तत्कालीन तालुका प्रमुख आणि इतर तीन जण शुक्रवारी न्यायालयात हजर झाले होते. त्यांचे काढलेले वाॕरंट विना तामील झाले होते. त्यामुळे न्यायालयाने चौघांचा जामीन रद्द केला होता.पुन्हा न्यायालयाने दंड लावला आणि नवीन जामीन देण्याचा आदेश चौघांना दिला होता. रीतसर वकिलामार्फत काल जामीन मिळाला आहे.
मात्र राज ठाकरे आणि मनसेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख अभय सोळूंके हजर राहत नसल्यामुळे त्यांना पुन्हा (अजामीनपात्र) अटक वॉरंट जारी केले असल्यामुळे पोलिसांना त्यांना निलंगा न्यायालयात हजर करावे लागणार आहे. येथील न्यायालयाने राज ठाकरे आणि अभय सोळूंके यांना हजर करा, असे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सहा वर्षानंतर राज ठाकरे यांना निलंगा न्यायालयात हजर रहावेच लागणार आहे. चिथावणीखोर भाषण दिले म्हणून ते या प्रकरणातील आठवे आरोपी आहेत.