Dhiraj Deshmukh on Anganwadi Sevika Payment : आमदार धिरज देशमुख यांनी अंगणवाडी सेविकांना त्यांचा लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरुन दिल्याबद्दलचा मोबदला कधी देणार असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे.
लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरुन देण्यासाठी अंगणवाडी सेविकांचं मोठं योगदान
विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर घाई गडबडीत सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करुन योजनेच्या लाभासाठी सुरुवातीला कमी दिवसाची मुदत दिली. या मुदतीत आणि त्यानंतर वाढवून दिलेल्या मुदतीत गाव आणि शहरांतील अंगणवाडी सेविकांनी खूप मेहनत घेतली. पात्र लाभार्थींना लाभ मिळवून देण्यासाठी कागदपत्र व लाभासाठी मार्गदर्शन केले. किंबहुना अंगणवाडी सेविकांच्या योगदानामुळेच तळागाळातील वंचित आणि दुर्लक्षित महिलांना योजनेचा लाभ मिळाला.
योजनेचा प्रचार आणि प्रसार करुन ही योजना यशस्वी करण्यात अंगणवाडी सेविकांचा सिंहाचा वाटा आहे. याचा विसर योजनेचे श्रेय लाटण्यात दंग असलेल्या सरकारला पडला असल्याची टीका आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केली. राज्यभरातील हजारो अंगणवाडी सेविकांचा लाखो रुपयांचा अर्ज भरलेला मोबदला शासनाने अडवून ठेवला असून तो कधी देणार, यावर कोणी चकार शब्द बोलायला तयार नाही. यामुळे हा मोबदला मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
Dhiraj Deshmukh : लाडक्या बहिणींना लाभ मिळवून देणाऱ्या अंगणवाडीताईंना मानधन कधी मिळणार? आमदार धिरज देशमुखांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
मुख्यमंत्री यांनी अंगणवाडी ताईंनाही विचारावे…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अनेक कार्यक्रमातून महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसा मिळाले का? असे विचारत आहेत. हाच प्रश्न ते अंगणवाडी सेविकांना विचारण्याचे विसरुन गेल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेचा कणा ठरलेल्या अंगणवाडी सेविकांनाही अर्ज भरल्याचे मानधन देऊन त्यांनाही पैसे मिळाले का, याची विचारणा करावी, अशी मागणी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी या वेळी केली. या आशयाचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे.