रस्तोरस्ती लावणार ‘रोडरोमिओं’चे फलक, छेड काढणाऱ्यांची परेड, पुणे पोलिसांचा मोठा निर्णय

Pune Police Decided To Put Road Romeo Posters: गणेशोत्सव काळात गर्दीत मुलींची छेड काढणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आता पुणे पोलिसांनी या रोड रोमिओंचे पोस्टर्स चौकात लावण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र टाइम्स
म. टा. प्रतिनिधी, पुणे: गणेशोत्सवात देखावे पाहायला आणि गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या महिला आणि तरुणींची छेड काढून त्रास देणाऱ्या रोडरोमिओंची छायाचित्रे रस्तोरस्ती, भरचौकात फ्लेक्सवर प्रसिद्ध करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. रोडरोमिओंना धडा शिकवण्यासाठी पोलिसांनी हा उपाय शोधला आहे. तसेच, रोडरोमिओंची परेड देखील घेतली जाणार आहे.

पुण्याच्या गणेशोत्सवासाठी राज्याच्या कानकोपऱ्यातून आणि देश-विदेशातून लोक येत असतात. विशेषत: विसर्जन मिरवणूक गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण असून, लक्ष्मी रस्त्यासह मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर गर्दी असते; तसेच गणेशोत्सवाचे दहाही दिवस देखावे पाहण्यासाठी लोक गर्दी करतात. या गर्दीचा गैरफायदा घेऊन चोरटे नागरिकांच्या मुद्देमालावर डोळा ठेवून असतात. तर, काही जण महिला, तरुणींसोबत अश्लील वर्तन करतात, असे दिसून आले आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी महिला, मुलींचा छेड काढणाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे.

‘गणेशोत्सवात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते असून, महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी महिला पोलिस, दामिनी मार्शलची पथके नेमण्यात येणार आहेत. गुन्हे शाखेच्या पथकांना छेडछाड करणाऱ्या रोडरोमिओंवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महिलांच्या सोबत गैरकृत्य करताना कोणी आढळून आल्यास, त्यांचे फोटो काढून शहरात फ्लेक्सवर नावासह लावणार आहेत. त्यांची रस्त्यावर परेड सुद्धा घेणार आहेत,’ अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.

शहराच्या मध्यवस्तीत प्रमुख सहा ठिकाणी पोलिसांच्या शीघकृती दलाची पथके नेमली जाणार आहेत. प्रामुख्याने विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर ही पथके असतील. दहा दिवस त्यांच्याकडून मचाणावरून बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.

पोलिसांची अठरा मदत केंद्रे

गणेशोत्सवात नागरिकांना माहिती देण्यासाठी आणि सुक्षेच्या दृष्टीकोनातून गौरसोय होऊ नये, म्हणून पोलिसांकडून अठरा मदत केंद्रे उभारण्यात येणार आहेत. शहराच्या मध्यवस्तीत ही केंद्रे २४ तास सुरू राहतील. स्थानिक पोलिस ठाणे, विशेष शाखा, गुन्हे शाखा, वाहतूक विभाग यांचे अधिकारी कर्मचारी या केंद्रावर कार्यरत राहतील.

चोरट्यांवर ठेवणार लक्ष

गणेशोत्सवातील गर्दीचा गैरफायदा घेऊन चोरटे नागरिकांच्या किमती मुद्देमालावर डल्ला मारतात. यात मोबाइल चोरट्यांची संख्या अधिक असते. बाहेरील राज्यातून चोरट्यांच्या टोळ्या या काळात शहरात दाखल होतात, असे दिसून आले आहे. त्यामुळे गुन्हे शाखेची पथके चोरट्यांवर लक्ष ठेवून असतील. त्यांनी आतापासून पोलिस रेकॉर्डवरील चोरट्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे.

गणेशोत्सव काळात नागरी सुरक्षेसाठी पोलिस सज्ज आहेत. विशेषत: महिला सुरक्षेवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. महिला, मुलींची छेडछाड करणाऱ्यांना कायमची अद्दल घडविण्यासाठी त्यांची छायाचित्रे फलकांवर छापून ते चौकाचौकात लावले जातील – अमितेशकुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

crime news todaypune police newsroad romeo posters in puneगणेशोत्सव २०२४पुणे क्राइम बातम्यापुणे पोलीसरोड रोमिओ
Comments (0)
Add Comment