Devendra Fadnavis Question Uddhav Thackeray: गेटवे ऑफ इंडिया येथील शिवपुतळा स्थानी आंदोलन करण्यासह राज्यभरात मविआकडून आंदोलन करण्यात आले. आंदोलनावेळी उद्धव ठाकरेंनी ‘शिवद्रोह्यांना गेट आऊट ऑफ इंडिया करण्याची वेळ आली आहे’ असा घणाघात केला. याच्या प्रत्युत्तरादाखल उपमुख्यमंमत्री देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना घेरले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, पहिली गोष्ट तर उद्धव ठाकरेंना सवाल आहे, जवाहरलाल नेहरुंनी डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये शिवाजी महाराजांबद्दल जे लिहलं आहे, त्यासंदर्भात काँग्रेसला माफी मागायला लावणार का? मध्यप्रदेश मध्ये बुलडोझर लावून शिवाजी महाराजांचा पुतळा पाडण्यात आला, त्यावर ठाकरे आणि शरद पवार का मूग गिळून बसले आहेत. कर्नाटकमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून छत्रपतींचा पुतळा हटवण्यात आला, यावर एक शब्द बोलायला तयार नाहीत.
काँग्रेसने इतिहासात काय शिकवलं तर शिवाजी महाराजांनी सूरत लुटली . सूरत लुटली नव्हती स्वराज्याचा खजिना त्या लोकांवर आक्रमण करुन परत मिळवला होता. महाराज जणू काही सामान्य माणसाची लूट करायला गेले होते, असा चुकीचा इतिहास शिकवणाऱ्यांना उद्धव ठाकरे तुम्ही माफी मागायला सांगणार आहात की, खुर्चीसाठी मिंधेपण स्वीकारणार आहात, याचं महाराष्ट्राला उत्तर द्यावं, अशा शब्दांत फडवणीसांनी उद्धव ठाकरेंना सुनावले आहे.
दरम्यान, शिवरायांचा पुतळा दुर्घटनेप्रकरणी राज्यातील वातावरण तापल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीने मुंबईमध्ये सत्ताधारी महायुतीविरोधात जोडे मारो आंदोलन केले. यासोबतच राज्यभर पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून जोडे मारो आंदोलन देखील करण्यात आले आहे. इतकेच नाहीतर उद्यापासून राज्यभर विविध पद्धतीने सरकारचा निषेध नोंदवण्यात येणार आहे. यावरुन भाजपने देखील प्रतिआंदोलन छेडून महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. मविआविरोधात भाजपने रविवारी राज्यभर निषेध आंदोलन केले. काही ठिकाणी मौन बाळगून विरोध दर्शविला आहे. तर काही ठिकाणी महाविकास आघाडी विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत भाजपने निषेध नोंदवला आहे. महाविकास आघाडी याप्रकरणाचं केवळ गलिच्छ राजकारण करत आहे असा आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात आला आहे.