Shivaji Maharaj Statue Collapse: छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमधील ३५ फुटांचा पुतळा २६ जुलैला कोसळला. ८ महिन्यांपूर्वी या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं.
प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी राजकोटवर जाऊन पुतळ्याची पाहणी केली. त्यांचा दौरा प्रशासनानं अतिशय गुप्त ठेवला होता. राम सुतार पुतळ्याची पाहणी करुन मुंबईत परतले. ते लवकरच याबद्दलचा अहवाल सरकारला देतील. पाहणी दौऱ्यावेळी सुतार यांच्यासोबत अतिशय मोजकेच अधिकारी हजर होते, असं वृत्त होतं. मात्र या वृत्तात कोणतंही तथ्य नसल्याचं राम सुतार यांचे पुत्र अनिल सुतार यांनी सांगितलं. याबद्दलच्या सर्व बातम्या त्यांनी फेटाळल्या आहेत. महाराष्ट्र टाईम्सशी बोलताना राम सुतार यांनी राजकोटवर जाऊन कोणतीही पाहणी केली नसल्याचं सांगितलं.
गेल्या सहा महिन्यांपासून राम सुतार यांना प्रवास करता येत नसल्याची माहिती त्यांचे पुत्र अनिल सुतार यांनी दिली. आठ दिवसांपासून राम सुतार आजारी आहेत. आमच्यापैकी कोणीही राजकोट किल्ल्याची पाहणी करायला गुप्त पद्धतीनं गेलेलं नाही, असं म्हणत अनिल सुतार यांनी सर्व बातम्या फेटाळल्या. महाराजांचा पुतळा कोसळला यात त्या शिल्पकाराची नक्कीच चूक दिसते. वाऱ्याच्या वेगानं पुतळा पडला असेल असं मला वाटत नाही, असं अनिल सुतार म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट झाली. त्यांच्यासोबत या घटनेबाबत सविस्तर चर्चा झाल्याचं अनिल सुतार यांनी सांगितलं.
मालवणमध्ये उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २६ ऑगस्टला कोसळला. या पुतळ्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं होतं. ३५ फुटांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यांमध्ये कोसळल्यानं त्याच्या बांधकामाच्या दर्जाबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. या पुतळ्याचं काम ठाण्यातील जयदीप आपटेला देण्यात आलं होतं. त्याला इतका मोठा पुतळा उभारण्याचा अनुभवच नसल्याची बाब समोर आली आहे. पुतळ्यासाठी वर्क ऑर्डर काढण्यात आल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत त्याचं काम पूर्ण झालं. इतका मोठा पुतळा उभारण्यासाठी साधारणत: तीन वर्षांचा कालावधील लागतो. कला संचलनालयानंदेखील या प्रकरणात महत्त्वाची माहिती दिली आहे. आम्ही केवळ ६ फूट उंचीच्या पुतळ्याला उभारणी दिली होती. तिथे ३५ फुटांचा पुतळा उभारला जाणार याची आम्हाला कोणतीही कल्पना नव्हती, असा दावा संचलनालयानं केला आहे.