president draupadi murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सोमवार ( 2 सप्टेंबर) कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यामुळे प्रशासनाची सध्या दौऱ्याच्या नियोजनासाठी धावपळ सुरू आहे. श्री अंबाबाई दर्शन, शासकीय विश्रामगृह, वारणानगर येथील नियोजित कार्यक्रमाच्या ठिकाणी रविवारपासूनच पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे.
श्री वारणा महिला सहकारी विविध उद्योग समुहाचा सुवर्ण सोहळा आणि वारणा विद्यापीठाचा उद्घाटन समारंभ निमित्ताने वारणा नगर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास भारताच्या राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती मुर्मू या उद्या सकाळी 11 वाजता कोल्हापूर विमानतळावर दाखल होणार आहेत. त्यानंतर अंबाबाईचे दर्शन घेणार असून त्या काही वेळ सर्किट हाऊस येथे थांबून पुढे कार्यक्रमासाठी वारणा कोडोली कडे प्रस्थान करणार आहेत. या दरम्यान पोलिसांनी या संपूर्ण मार्गावर व कार्यक्रमस्थळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.
नागरिकांना सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत देवीचे दर्शन बंद
राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे शहरातील वाहतूकीत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर अंबाबाईच्या मंदिरात भाविकांची गैरसोय होऊ नये. यासाठी सर्वसामान्य नागरिकांना सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत देवीचे दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन देखील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे. या दौऱ्यादरम्यान अंबाबाई मंदिराकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या मार्गावर मोटार वाहनांची वाहतुक सुरळीत ठेवण्या करिता दौऱ्या दरम्यान वन वे मार्ग शिथिल करणे, आवश्यकतेनुसार वाहतुक सुरु-बंद करण्यात येणार आहे.
असा असणार पोलीस बंदोबस्त
या संपूर्ण दौऱ्या दरम्यान विमानतळ परिसर, अंबाबाई मंदिर, शासकीय विश्रामगृह, रस्त्याच्या दुतर्फा नेमलेले पॉईंट यासह वारणानगर येथील कार्यक्रमाच्या ठिकाणी बंदोबस्त तैनात केला असून पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली ३ अपर पोलिस अधीक्षक, उपअधीक्षक -१२,पोलिस निरीक्षक -३६,उपनिरीक्षक -१३२,पोलिस अंमलदार -११०१ ,महिला पोलिस -२०८,वाहतुकीसाठी पोलिस- २७३,जलद कृती दल -१० असा तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच वारणा कोडोली येथेही अतिरिक्त बंदोबस्त असणार असून यासाठी कोल्हापूरसह परिक्षेत्रातील सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीण येथून अतिरिक्त बंदोबस्त मागविण्यात आला आहे.