महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 2 Sept 2024, 6:00 am
Ravi Rana On BJP : आगामी विधानसभेसाठी रवी राणा यांनी सावध पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. भरमंचावरुन रवी राणा यांनी अप्रत्यक्षरित्या आपण भाजपासोबत नसल्याचे जाहीर केले असे बोलले जात आहे. याला कारण असे की रवी राणा यांनी थेट आपण भविष्यात कधीही भाजपासोबत जाणार नाही असे थेट विधान केले आहे.
नेमके काय म्हणाले मंचावरुन रवी राणा?
आमदार रवी राणा यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचे अभिनंदन केले. राणा म्हणाले, कारण त्यांनी ५० पेक्षा जास्त सभा खासदार नवनीत राणा यांच्या विजयासाठी घेतल्या होत्या. मात्र दुर्दैवाने त्यांचा पराभव झाला. रवी राणा पुढे म्हणाले, नवनीत राणा जरी आपल्या भारतीय जनता पक्षासोबत आल्या तरी त्या तुमच्या पक्षाच्या नेत्या आहेत. मी युवा स्वाभिमान पक्षाचा कार्यकर्ता आहे. मी भविष्यात कधीही भारतीय जनता पक्षामध्ये जाणार नाही हे स्पष्ट करतो आणि धन्यवाद देतो असे रवी राणा म्हणाले. पण रवी राणा यांचे हेच विधान आगामी विधानसभेसाठी सावध पावले टाकणारे असावे असे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे.
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या दहीहंडीला खूप शुभेच्छा दिल्या. बावनकुळेंनी पुढे राणा दाम्पत्याचे कौतुक केले. यावेळी बावनकुळे म्हणाले, की आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष हा महायुतीतील घटक आहे त्यामुळे ते आणि आम्ही एकच आहोत असं म्हणत बावनकुळे यांनी रवी राणांच्या विषयावर पडदा टाकला.
Ravi Rana : भविष्यात भाजपासोबत जाणार नाही! बावनकुळेंच्या समोरच रवी राणांची घोषणा
अमरावतीत दहीहंडी जल्लोषात!
आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या पुढाकाराने युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने दरवर्षी दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी सुद्धा नवाथे चौकात आयोजित दहीहंडी स्पर्धेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम रेलचेल होती. यामध्ये रांगोळी स्पर्धा, लोकनृत्य स्पर्धा ,लावणी सोलो डान्स अशा विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लाडकी बहीण योजनेला ही दहीहंडी समर्पित केल्याचे आमदार रवी राणा यांनी आपल्या भाषणातून सांगितलेय यावेळी सिनेकलावंत चंकी पांडे, तुषार कपूर यांच्यासह अनेक कलावंत उपस्थित होते. दीडशे फुटाच्या दहीहंडीला फुलांनी सजवण्यात आले होते त्यावर असलेल्या हंडीवर महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना समर्पित दहीहंडी असा उल्लेख केला होता. यावेळी काही महिलांचा सत्कार सुद्धा करण्यात आला उत्कृष्ट नृत्य करणाऱ्या युवक युवतींना प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.