मराठवाड्यात पावसाचा हाहाकार! हिंगोली, नांदेड, परभणीत मुसळधार; २००हून अधिक नागरिकांचे स्थलांतर

Marathwada Rain Update: बंधाऱ्यात येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेता मुदगल बंधाऱ्याचे दोन दरवाजे उघडले असून, ४९८ क्यूसेकने; तसेच पूर्णा नदीपात्रात ४९.६० क्यूसेक विसर्ग करण्यात आला आहे.

महाराष्ट्र टाइम्स
hingoli river
म. टा. विशेष प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात सप्टेंबर महिन्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानुसार नांदेड, परभणी व हिंगोलीत शनिवारी मध्यरात्रीपासून पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. हिंगोलीत घरात पावसाचे पाणी शिरल्याने २००हून अधिक नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. नांदेडमध्ये शहरात पाच तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. २४ तास उलटून गेले तरी रविवारी रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. परभणीतही जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. बीड जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांत मोठ्या पावसाने हजेरी लावली आहे.

हिंगोलीत हाहाकार

हिंगोली जिल्ह्यात पावसाने हाहाकार उडाला आहे. रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले असून, हिंगोलीतून वाहणारी कयाधू नदी ओसंडून वाहत आहे. रविवारी पहाटे पाच ते दुपारी दोन वाजेपर्यंत मुसळधार पाऊस झाला. पावसाचा सर्वाधिक परिणाम शहरात दिसून आला. शहरातील सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत होते. पालिकेने दहा वेगवेगळ्या टीम तयार करून जेसीबी मशिन पाठवले होते. लोकांकडून माहिती मिळताच पालिका कर्मचाऱ्यांनी तेथे जाऊन जेसीबीद्वारे पाणी काढले. गेल्या पंधरा वर्षांत प्रथमच कयाधू नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याचे रहिवाशांनी सांगितले.

दैठणात ढगफुटीसदृश

परभणी जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. दैठणा परिसरात ढगफुटीसारखा पाऊस पडल्याने दैठणा ते माळसोन्ना रस्त्यावर पाणी साचले होते. परिणामी, हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. परभणी जिल्ह्यात रविवारी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत सरासरी २०.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

पाच तालुक्यांसह नांदेडमध्ये अतिवृष्टी

नांदेड जिल्ह्यात शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे हदगाव, भोकर, किनवट, माहूर व हिमायतनगर या तालुक्यांसह २६ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्ह्यात रविवारी सकाळी साडेआठला संपलेल्या २४ तासांत सरासरी ५६.१० मिलिमीटर पाऊस झाला. हा पाऊस १२ मंडळांत १०० मिलिमीटरपेक्षा अधिक झाला. या पावसामुळे खरीपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत आहे. पैनगंगा नदीवरून पाणी वाहत असल्याने वाहतूक काही काळ बंद होती. तेलंगणा राज्यातील कामारेड्डी रेल्वे पुलावरून पाणी वाहत असल्याने नांदेड-निजामाबाद रेल्वेसेवा काही काळ विस्कळित झाली होती. जिल्ह्यात १२ जनावरांचा अतिवृष्टीने मृत्यू झाला. २९ घरांची पडझड झाल्याचे प्रशासनाने कळविले.
Parbhani Rain : मागील २४ तासांत परभणीत मुसळधार; जनजीवन विस्कळीत, जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर
‘बिंदुसरा’तून विसर्ग

बीड शहराला पाणीपुरवठा करणारे बिंदुसरा धरण शनिवारी भरले होते. रविवारच्या पावसानंतर धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग होत आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. लातूर शहर व जिल्ह्यात दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती. मांजरा धरणातील पाणीपातळी ४०.५८ टक्के आहे. औसा, निलंगा, उमरगा या तालुक्यांना पाणीपुरवठा असलेल्या होत असलेल्या निम्न तेरणा धरणातील पाणीपातळी ३५ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरात सायंकाळपर्यंत ४.५ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. जायकवाडी धरणात सायंकाळी सहापर्यंत ८४.९० टक्के पाणीसाठा झाला होता. १६ हजार २०२ क्युसेक आवक सुरू होती. जायकवाडीतून उजव्या कालव्यात माजलगावसाठी ७०० क्युसेक विसर्ग सुरू होता.

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

chhatrapati sambhajinagar newshingoli rain newsimd weather forecastMarathwada Rain Updatemarathwada rainfallnanded rain news todayparbhani rain weatherपावसाचे ताजे अपडेटमान्सून अपडेट
Comments (0)
Add Comment