samarjit singh ghatge : समरजितसिंह घाटगे हे भाजपशी काडीमोड करून तुतारी हातात घेणार आहेत. उद्या (3 सप्टेंबर) कागल येथील ऐतिहासिक गैबी चौकात शरद पवार यांच्या उपस्थितीत समरजित घाटगे यांचं पक्ष प्रवेश होणार असून यासाठी शरद पवार आजच कोल्हापुरात दाखल झाले आहेत.
घाटगेंकडून शरद पवारांचं स्वागत
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज पासून पुढील तीन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. आज दुपारी बाराच्या सुमारास त्यांचं कोल्हापूरमध्ये आगमन झाले आहे. पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देत त्यांनी स्वागत केलं आहे. तसेच काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील आणि समरजित घाटगे यांनी शरद पवार यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं आहे.
असा आहे पवारांचा दौरा
शरद पवार आज पासून पुढील तीन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर असून पहिल्यांदाच त्यांनी इतका दिवस कोल्हापूरात आपला मुक्काम ठोकणार आहे. शरद पवार हे उद्या सकाळी दहा वाजता आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी चारच्या सुमारास ते कागलमध्ये समरिजत घाटगे यांच्या पक्षप्रवेशासाठी पोहोचतील. तर बुधवारी भारत पाटणकर यांच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त कोल्हापुरात शाहू सभागृहात सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर शरद पवार यांची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक होणार आहे. गुरुवारी स्वर्गीय पतंगराव कदम यांचा पुर्णाकृती पुतळ्याच्या लोर्कापणासाठी ते सांगलीमध्ये जातील. त्या कार्यक्रमानंतर ते बारामतीकडे प्रस्थान करणार आहे.
कागलचं वातावरण तापणार
समरजित सिंह घाटगे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतल्यानंतर कागलच राजकारण तापलं आहे. कारण हसन मुश्रीफ यांनी शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांचा हात पकडला आणि महायुती मध्ये सामील झाले. यामुळे 2019 पासून निवडणुकीनंतर 2024 च्या निवडणुकीची तयारी करत असलेले भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांची अडचण झाली. आगामी विधानसभा निवडणुकीत कागल विधानसभा मतदारसंघातून हसन मुश्रीफ हेच महायुतीचे उमेदवार असतील असे म्हणत अजित पवार यांनी घोषणा केली. यामुळे समरजित घाटगे यांनी आपला राजकीय प्रवास बदलत देवेंद्र फडणवीस आणि भाजपची साथ सोडली. आणि शरद पवार यांच्या नेतृत्वात तुतारी चिन्हावर निवडणूक लढण्याचं निर्धार करत उद्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात हे सामील होणार आहेत. यामुळे उद्याच्या कार्यक्रमात शरद पवार हसन मुश्रीफ यांच्या वर आपली तोफ कश्या पद्धतीने डागणार हे पाहणे औत्सुक्याचे बनले आहे. मात्र शरद पवार यांच्या या खेळीमुळे विधानसभा निवडणुकीत कागलमध्ये शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना पहायला मिळणार हे नक्की आहे.