maharashtra election 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जन सन्मान यात्रा आज बारामतीत पोहचली. यावेळी जय पवार यांच्या नेतृत्वाखाली युवकांनी दुचाकीची रॅली काढली. या रॅलीच्या अगोदर जय पवारांनी पत्रकारांशी बोलताना बारामतीतून विधानसभेला उभे राहण्याचे संकेत दिले आहेत.
अजितदादा ठरवतील तो निर्णय मान्य असेल
पत्रकारांनी जय पवार यांना तुम्ही विधानसभेला इच्छुक आहात का..? असा प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना जय पवार म्हणाले की, ”मी विधानसभेला इच्छुक आहे मात्र निर्णय अजितदादांच्या हाती असेल. अजितदादा ठरवतील तो निर्णय मला मान्य असेल.” असं जय पवार यांनी सांगितलं आहे. तर दुसरीकडे युगेंद्र पवार यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार असा सामना होण्याची शक्यता आहे.
जन सन्मान यात्रेला चांगला प्रतिसाद
जय पवार पुढे म्हणाले की, ” मागच्या यात्रेपेक्षा आजच्या जन सन्मान यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. अजित पवार यांचे फिक्स मुख्यमंत्री नावाचे बॅनर्स झळकले आहेत. यावर बोलताना जय पवार म्हणाले की, ”अजितदादा मुख्यमंत्री होत असतील तर ही चांगली गोष्ट आहे. अशी सर्वांचीच या अगोदरपासून इच्छा आहे. आगामी विधानसभेसाठी आपले नाव चर्चिले जात आहे. युवकांकडून तशी मागणी होत आहे”.
यात्रेनिमित्त जय आणि युगेंद्र पवार आले होते एकत्र
श्रावणातील शेवटच्या शनिवारी दरवर्षी होणारी कन्हेरी येथील मारुतीरायाची यात्रा चर्चेत आली. या यात्रेच्या कुस्ती मैदानात एकाच वेळी जय पवार आणि युगेंद्र पवार समोरासमोर आले होते. अर्थात दोघेही समोरासमोर आले आणि दोघांनीही एकमेकांची गळाभेट घेतली. कन्हेरीकरांनी मात्र एकाच वेळी दोघांच्या हातात चांदीची गदा दिली. चांदीची गदा हातात घेताना दोघांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे आता खरोखरच जय पवार आणि युगेंद्र पवार यांच्यातच लढत झाली. तर तालुक्यातील राजकीय गदा कोण घेणार? रंगीत तालमीचा भाग नव्हता ना? अशी देखील चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.