आदित्य आलाय, पण जाणार नाही, तेव्हाच पोलिसांना सांगितलेलं! राणेंकडून राजकोटवरील घटनाक्रम कथन

Narayan Rane: राजकोट किल्ल्याच्या परिसरात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २६ ऑगस्टला कोसळला. त्याची पाहणी करायला आमदार आदित्य ठाकरे गेले होते. तेव्हा त्यांचा राणे समर्थकांशी वाद झाला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
मुंबई: मालवणमधील छत्रपतींचा पुतळा कोसळल्यानंतर त्याच्या पाहणीसाठी शिवसेना उबाठाचे आमदार आदित्य ठाकरे पक्षाच्या नेत्यांसह गेले होते. त्यावेळी भाजप खासदार नारायण राणे आणि त्यांचे कार्यकर्ते तिथेच होते. राणे आणि ठाकरे समर्थक आमनेसामने येताच जोरदार राडा झाला. दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी झाली. अखेर दोन तासांनी वातावरण शांत झालं. आदित्य ठाकरे, त्यांच्यासोबतचे नेते आणि कार्यकर्ते राजकोट किल्ल्यावरुन उतरल्यानंतर तणाव निवळला. या सगळ्यावरुन आता राणेंनी ठाकरे कुटुंबाचा समाचार घेतला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं दुर्दैवी आहे. पण विरोधकांनी त्या घटनेचं राजकारण केलं, असं नारायण राणे म्हणाले. ‘मालवण माझ्या मतदारसंघात येत असल्यानं मी तिथे गेलो होतो. तेव्हा मला राजकोट परिसरात काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार भेटले. त्यांच्याशी माझा काही मिनिटं संवाद झाला. त्यांची विचारपूस करुन मी निघालो. तितक्यात मागून जोरात घोषणा सुरु झाल्या. माझ्यासोबत तेव्हा पोलीस अधीक्षक होते. कोण आलंय, घोषणा कोण देतंय, अशी विचारणा मी त्यांच्याकडे केली. त्यावर आदित्य ठाकरे आणि त्यांचे कार्यकर्ते आल्याचं त्यांनी सांगितलं. मी त्याचवेळी त्यांना म्हटलं, आता हे आलेत. पण परत जाणार नाहीत,’ अशा शब्दांत राणेंनी २८ ऑगस्टला राजकोटवर घडलेला घटनाक्रम मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत कथन केला.
Aaditya Thackeray vs Narayan Rane: वेगवेगळ्या वेळा ठरलेल्या, पण तरीही ठाकरे-राणे आमनेसामने; किल्ल्यावर नेमकं काय घडलं?
‘मी किल्ल्यावर हजर होतो. पोलिसांनी एकावेळी एकाला किल्ल्यावर येण्याची परवानगी देणं अपेक्षित होतं. पण आम्ही तिथे असताना आदित्य ठाकरे, विनायक राऊत, वैभव नाईक तिथे आले. पुतळा कोसळल्याची घटना दु:खद आहे. त्यामुळे पुतळ्याची पाहणी करताना त्यांनी शांतता राखणं गरजेचं होतं. पण त्यांनी घोषणा सुरु केल्या. तेव्हाच मी पोलिसांना म्हटलं आता हे काय परत जाणार नाहीत. त्यांनी दोन तासांत अनेकदा निघण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही तिथेच होतो. ते लोक जागचे हलू शकले नाहीत,’ असं राणे म्हणाले.

Narayan Rane: आदित्य आलाय, पण जाणार नाही, तेव्हाच पोलिसांना सांगितलेलं! राणेंकडून राजकोटवरील घटनाक्रम कथन

‘काही वेळानं राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील तिथे आले. मला भेटले. साहेब, तुम्ही मोठं मन करा. त्यांना जाऊ द्या अशी विनंती केली. मी म्हटलं यांना सोडणार नाही. जयंत पाटील तीनदा येऊन भेटले. मग त्यांना म्हटलं, यांना इथून जाऊ देतो. पण इथून गुपचूप निघायचं. आम्ही थोडी जागा करुन देतो. तिथून जायचं आणि जाताना मान खाली घालून जायचं. मान वर केली तर मग बघा,’ अशा शब्दांत राणेंनी राजकोटवर गेल्या आठवड्यात घडलेली घटना सविस्तर सांगितली.

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

aditya thackerayMaharashtra Political NewsNarayan RaneRajkot Fortshivaji maaraj statue collapseआदित्य ठाकरेछत्रपती शिवाजी महाराज पुतळानारायण राणेमहाराष्ट्र राजकीय बातम्याराजकोट किल्ला
Comments (0)
Add Comment