BJP RSS Meeting: लोकसभा निवडणुकीत महायुतीनं राज्यात सपाटून मार खाल्ला. मुंबईत महायुतीला केवळ २ जागा मिळाल्या. तर ठाकरेसेनेला तीन जागा मिळाल्या. यानंतर आता भाजपनं विधानसभेसाठी कंबर कसली आहे.
विधानसभेच्या तयारीसाठी मुंबईतील भाजपच्या आमदारांची एक बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. जवळपास सहा तास ही बैठक झाली. रुटिन बैठक असल्याचं संघाच्या पदाधिकाऱ्याकडून सांगण्यात आलं. पण या बैठकीत काय झालं, याचा तपशील सांगण्यास संघ, भाजपमधील एकही नेता, पदाधिकारी, आमदार तयार नाही. सगळ्यांनी या बैठकीबद्दल मौन बाळगलं आहे. त्यामुळे या मॅरेथॉन बैठकीत नेमकं काय घडलं, याबद्दल उत्सुकता आहे.
मध्य मुंबईतील लोअर परळ भागातील यशवंत भवनात भाजप आणि संघाची बैठक संपन्न झाली. बैठकीनंतर भाजपचे आमदार माध्यमांशी काहीही न बोलता निघून गेले. पदाधिकाऱ्यांनीदेखील बैठकीबद्दल बोलण्यास नकार दिला. लोकसभा निवडणुकीत संघाचे स्वयंसेवक फारसे मैदानात उतरले नाहीत. संघ बऱ्याच प्रमाणात निष्क्रिय राहिला. त्याचा फटका भाजपला बसला.
लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सहापैकी चार जागा महाविकास आघाडीनं जिंकल्या. वायव्य मुंबईत ठाकरेसेनेच्या अमोल कीर्तीकरांचा अवघ्या ४६ मतांनी पराभव झाला. अन्यथा मविआच्या जागा पाच झाल्या असत्या. २०१९ मध्ये मुंबईत ३ जागा जिंकणाऱ्या भाजपला केवळ एक जागा मिळाली. तर पक्षफुटीनंतरही ठाकरेंनी तीन जागांचा आकडा टिकवला.
BJP RSS Meeting: भाजप आमदार, संघ नेत्यांची बंद दाराआड बैठक; सहा तास चर्चा; मीटिंगबद्दल कोणीही बोलेना
२०१९ मध्ये एकसंध शिवसेना आणि भाजपची युती होती. तेव्हा युतीनं मुंबईत ३६ पैकी ३० जागा जिंकल्या होत्या. पण पक्षफुटीनंतर परिस्थिती बदलली आहे. ठाकरेंनी लोकसभेला २१ जागा लढवून ९ जागा जिंकल्या. मुंबईतील आकडा त्यांनी कायम राखला. त्यामुळे मुंबईत ठाकरेंना शह देण्यासाठी आणि अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी भाजपनं व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे.