maharashtra election 2024 : कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार असून हा दादाचा वादा आहे असं अजित पवार म्हणाले आहेत. फलटण येथे संवाद मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. त्याचबरोबर या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, रूपाली चाकणकर हे देखील उपस्थित होते.
कार्यकर्ते फोडून भाजपामध्ये पक्ष प्रवेश करून घेणे गंभीर बाब
अजित पवार पुढे म्हणाले की, ”राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना धमक्या देणे, भीती दाखविणे तसेच कार्यकर्ते फोडून भाजपामध्ये पक्ष प्रवेश करून घेणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. याची आपण गांभीर्याने नोंद घेऊन भाजपच्या वरिष्ठ नेतेमंडळींशी चर्चा करणार आहोत. आपण कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम उभे आहोत हा दादाचा वादा आहे, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
एकमेकांच्या कार्यकर्त्यांचा आदर राखणे ही महायुतीची जबाबदारी
अजित पवार म्हणाले की, ”महायुतीमध्ये आपण असलो तरी समन्वय राखून काम करण्याचे ठरलेले आहे. त्यामुळे एकमेकांच्या कार्यकर्त्यांचा आदर राखणे ही महायुतीमधील सर्वांची जबाबदारी आहे. जो कार्यकर्त्यांना धमकविण्याचा आणि पक्षप्रवेश करून घेण्याचा प्रयत्न होत आहे. याबाबत त्याची गांभीर्याने दखल घेऊन भाजपच्या राज्य व राष्ट्रीय पातळीवर नेतेमंडळींशी स्वतः चर्चा करणार आहे. यापुढे असले प्रकार घडू नये, याची दक्षता घेणार आहे. कार्यकर्त्यांच्या जीवावर पक्ष चालत असतो. जर कार्यकर्तेच अडचणीत असतील तर पक्षाचा काय उपयोग? याची आम्हाला जाणीव आहे. आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत. कार्यकर्त्यांना ज्या धमक्या येत आहेत, त्याची दखल गांभीर्याने घेतली आहे.
दरम्यान, मेळाव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला विधान परिषदेचे माजी सभापती आ.रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आदी उपस्थित होते.आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. भाजपच्या नेतेमंडळीकडून कार्यकर्त्यांना होणारे त्रासाची माहिती देऊन कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घ्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली होती .