Nandurbar News : नाट्य मंदिरातील लग्नांमध्ये तरुणाने वेटरचं काम केलं होतं, पोलीस भरती झाल्यावर त्याच नाट्य मंदिरात हजारो लोकांसमोर त्याने सत्कार स्वीकारला. आकाशने सांगितेलाल अनुभव ऐकून अनेकांचे डोळे पाणावले.
ही गोष्ट एखादा चित्रपटाला साजेशी वाटते. मात्र चिकाटी व जिद्दीला गुरूंची साथ मिळाली तर यशाच्या शिखरावर पोहोचता येते, असाच अनुभव २९ वर्षीय आकाश कापुरे याला आला आहे. नंदुरबार पोलीस भरतीत त्याची निवड झाल्याने येथील शिवाजी नाट्य मंदिरात आयोजित कार्यक्रमात त्याचा सत्कार करण्यात आला.
बिकट परिस्थितीत बालपण
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे राहणाऱ्या आकाश कापुरे याच्या कुटुंबात आई-वडील व चार भावंडे. त्याची घरची परिस्थिती अतिशय बिकट आहे. वडील किशोर तोताराम कापुरे हे गवंडी काम करत असताना त्यांचा अपघात झाला. त्यामुळे दहा वर्षांपासून ते अंथरुणाला खिळून आहेत. आई सुनंदा कापुरे या दोंडाईचा येथे मिरची कांडप केंद्रात मोलमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र मुलांनी शिकावं व स्वतःच्या पायावर उभं राहावं, यासाठी त्या कायमच मुलांना प्रेरणा देत होत्या.
२०१२ मध्ये आकाशचे बारावीपर्यंत शिक्षण झाले. त्याने दोंडाईचा येथील एका कॉलेजमध्ये सिव्हिल डिप्लोमाला प्रवेश घेतला. मात्र त्या ठिकाणी लागणाऱ्या शैक्षणिक साहित्यासाठी पैसे नसल्याने त्याला शिक्षण अर्ध्यावरच सोडावे लागले. २०१४ मध्ये तो पहिल्यांदा पोलीस भरतीत सहभागी झाला होता. मात्र त्यानंतर दहा वर्षांच्या प्रयत्नांनी त्याला यश आलं आणि २०२४ मध्ये नंदुरबार येथे झालेल्या पोलीस भरतीत त्याची निवड झाली.
अन् हॉटेलचा वेटर झाला पोलीस
आकाशने विविध ठिकाणी अर्ज केले. मात्र यश येत नव्हते. त्या दरम्यान आकाशने दोंडाईचा येथील मिरची कांडप केंद्रात काम केले. गवंड्याच्या हाताखाली मजूर म्हणूनही काम केले. मिरची पथारीवर मिरच्या खुडण्याचे काम केले. नंदुरबार येथे एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केले. नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात होत असलेल्या लग्नांमध्ये केटरिंगचे काम करत होता. मात्र जिद्द कायम होती. घरच्या परिस्थितीची जाणीव असल्याने मिळालेल्या पैशातून पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत होता.
Police Recruitment Success Story: जिथे वेटर म्हणून काम, तिथेच जाहीर सत्कार; दहा वर्षांच्या मेहनतीनंतर पोलिसात भरती, लेकाने नाव काढलं
जिथे वेटर, तिथे सत्कार
त्याला नंदुरबार येथील भामरे अकॅडमीचे संचालक युवराज भामरे यांनी दत्तक घेतले. त्याची राहायची, खाण्याची व्यवस्था केली. तसेच क्लाससाठी एक रुपयाही घेतला नाही. २०२४ मध्ये झालेल्या भरतीत त्याची निवड झाली. भामरे अकॅडमीच्या संचालकांनी गरीब घरातील सुमारे १०० पेक्षा अधिक मुलांना दत्तक घेतले आहे. त्यांचा खाण्याचा राहण्याचा सर्व खर्च ते उचलतात. त्यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात आयोजित केला होता. त्या ठिकाणी हजारो लोकांसमोर आकाश कापुरे यांचा सत्कार करण्यात आला. ज्या ठिकाणी लग्नांमध्ये वेटरचे काम केले. त्याच ठिकाणी त्याचा सत्कार झाला. हजारो लोकांसमोर त्याने भाषण केले. त्याचे अनुभव सांगत असताना उपस्थित असलेल्या अनेक नागरिकांचे डोळे पाणावले.
रात्रभर जागले कुटुंब
घरात सर्वात मोठा मुलगा मिळेल ते काम करून दहा वर्षांच्या प्रयत्नानंतर नंदुरबार पोलीस म्हणून भरती झाला. ही बातमी कुटुंबीयांना माहिती झाल्यावर सर्व कुटुंबीय रडत रडत जागेच राहिले. हा दिवस मी कधीच विसरू शकणार नाही, असे सांगत जीवनात गुरु असेल, तर त्यांच्यामुळेच यशाचा मार्ग मिळतो. ज्या हॉटेलमध्ये मी वेटर म्हणून काम केले. त्याच हॉटेलमध्ये ट्रेनिंग पूर्ण केल्यावर संपूर्ण कुटुंबाला जेवायला घेऊन जाणार असल्याचे आकाश कापुरे याने सांगितले.