फॅमिली डॉक्टर संकल्पना मोडीत; ‘मटा संवाद’च्या चर्चासत्रामध्ये तज्ज्ञांचे स्पष्ट मत

Family Doctor Concept: ‘फॅमिली डॉक्टर’ हा वैद्यकीय व्यवस्थेचा कणा आणि सर्वसामान्यांचा हक्काचा आधार होता. आज फॅमिली डॉक्टरांची संख्या कमी झाली आहे. ही व्यवस्था मोडीत काढण्यासाठी समाज म्हणून आपणच कारणीभूत आहोत, असे स्पष्ट मत प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. निखिल दातार यांनी रविवारी व्यक्त केले.

महाराष्ट्र टाइम्स
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : ‘फॅमिली डॉक्टर’ हा वैद्यकीय व्यवस्थेचा कणा आणि सर्वसामान्यांचा हक्काचा आधार होता. आज फॅमिली डॉक्टरांची संख्या कमी झाली आहे. ही व्यवस्था मोडीत काढण्यासाठी समाज म्हणून आपणच कारणीभूत आहोत, असे स्पष्ट मत प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. निखिल दातार यांनी रविवारी व्यक्त केले. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने आयोजित केलेल्या ‘मटा संवाद’ या कार्यक्रमामधील ‘आजार, उपचार आणि मर्यादा’ या विषयावरील चर्चासत्रामध्ये ते बोलत होते.

डॉ. दातार यांच्यासह पन्नास वर्षांहून अधिक काळ फॅमिली डॉक्टर या नात्याने वैद्यकीय सेवा देणारे डॉ. सुहास पिंगळे, वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासक डॉ. श्रीराम गीत या मान्यवरांनीही आजाराचे बदलते स्वरूप, वैद्यकीय क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञान आणि उपचारांच्या मर्यादा या विषयांशी संबंधित विविध पैलूंचा अभ्यासपूर्ण वेध घेतला. विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघामध्ये झालेल्या या कार्यक्रमात सर्वसामान्यांच्या मनातील शंकाकुशंकांचेही सोप्या सहज भाषेमध्ये निरसन करण्यात आले. यावेळी डॉ. पिंगळे यांनी डॉ. दातार आणि डॉ. गीत यांना बोलते केले.

करोना संसर्गानंतर सर्वसामान्यांची आरोग्यजाणीव वाढीस लागली आहे. अनेक वैद्यकीय संज्ञा आता त्यांना ज्ञात आहेत, मात्र वैद्यकीय उपचारांच्या मर्यादांची जाणीव तितकी प्रगल्भ झालेली नाही. यासंदर्भात मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केले. या चर्चासत्रामध्ये डॉ. पिंगळे, डॉ. दातार आणि डॉ. गीत यांनी उपस्थितांना प्राणवायू, अतिदक्षता विभाग, डायलेसिस, व्हेंटिलेटर, सलाइन या रुग्णांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमागील वैद्यकीय तथ्य उलगडून सांगितले. आजारावर मात करून जीवन-मरणाच्या या संघर्षामध्ये वेदनादायी मृत्यूचा सामना कसा करायचा, इच्छामरण म्हणजे काय, यासंदर्भातील नेमके मार्गदर्शन डॉ. दातार यांनी केले. विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघात हा कार्यक्रम झाला. यावेळी ‘महाराष्ट्र टाइम्स’चे ज्येष्ठ पत्रकार सारंग दर्शने यांनी वक्त्यांचे स्वागत केले.

आज मोबाइलपासून वैद्यकीय उपचारांपर्यंत प्रत्येक बाबतीत पर्याय उपलब्ध आहेत. कोणता पर्याय निवडायचा हे रुग्ण ठरवतात. १९७०नंतर वैद्यकीय तंत्रज्ञानामध्ये प्रगती सुरू झाली. सिटीस्कॅन, एमआरआय, सोनोग्राफी, आयसीयू या सुविधांची उपलब्धता वाढत गेली. आयुर्मान दुप्पट झाले, मात्र जीवनशैलीचे आजार व त्यातील गुंतागुंत वाढली आहे. या आजारांसोबत कसे राहायचे याची माहिती सामान्यांना असणे गरजेचे आहे. पूर्वी फॅमिली डॉक्टरांना कुटुंबाची व्यवस्था, आजाराची पार्श्वभूमी, कुटुंबातील ताणतणाव, त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम याची कल्पना असायची. आज ही व्यवस्था राहिलेली नाही. सर्वसामान्यांना हक्काने मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध असणारी ही व्यवस्था त्यामुळे लयाला गेली. फॅमिली डॉक्टरांना स्वतंत्रपणे प्रॅक्टिस करण्यासाठी हजारो रुपयांचे जागेचे भाडे भरणे शक्य होत नाही. त्यामुळे तरुण डॉक्टर इथे कसे वळणार? येत्या दहा-पंधरा वर्षांत हातावर मोजण्याइतके फॅमिली डॉक्टर तरी राहतील का, असा साशंक प्रश्न डॉ. पिंगळे यांनी यावेळी उपस्थित केला.

सलाइन, अतिदक्षता विभाग, व्हेंटिलेटर या विषयासंदर्भात सामान्यांच्या मनामध्ये असलेल्या अवास्तव समजुती दूर करण्याचा प्रयत्न डॉ. गीत यांनी यावेळी केला. आजाराचे बदलते स्वरूप आणि वाढलेले वैद्यकीय खर्च, त्यात रुग्णांच्या कुटुंबापुढे उभे राहणारे नैतिक, आर्थिक पेच याविषयीही त्यांनी माहिती दिली. सलाइन, ऑक्सिजन लावले म्हणजे आजारी माणूस जिवंत राहतो, पूर्णपणे बराही होतो, असा सर्वसाधारण समज असतो, मात्र त्यात तथ्य नाही. सलाईन हा उपचार नसून हायड्रेशन व्यवस्थापन करण्याचा हा टप्पा असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक वैद्यकीय उपचारांच्या, इच्छामरण या विषयाच्या भल्याबुऱ्या दोन्ही बाजूंचा मान्यवरांनी या चर्चेमध्ये वेध घेतला.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘महाराष्ट्र टाइम्स’चे निवासी संपादक समीर कर्वे यांनी या चर्चासत्रामागील भूमिका विषद केली. आयुष्याच्या प्रवासाची वाट सुकर नसते. त्या मार्गावर खड्डे असतात. त्यामुळे तिथून पुढे जाण्यापूर्वी थोडी पूर्वतयारी केली तर हा प्रवास सुकर होऊ शकतो. आरोग्याच्या संदर्भातही ही पूर्वतयारी करण्यासाठी या विचारमंथानातून मदत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

Family Doctor Conceptgynecologist opinionmataa sanvadmedical fieldopen interaction on medical conceptsआरोग्य क्षेत्रातील अडचणीआरोग्यविषयक चर्चासत्रफॅमिली डॉक्टरची संकल्पनामटा संवादस्त्रीरोगतज्ज्ञांचे चर्चासत्र
Comments (0)
Add Comment