Vidhan Sabha Nivadnuk 2024 : उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर स्वेच्छानिवृत्त मंत्रालयीन सहसचिव सिद्धार्थ खरात यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन
सिद्धार्थ खरात हे मंत्रालयीन सहसचिव असताना त्यांनी एक जुलै रोजी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर आता त्यांनी राजकारणात येण्याचा मार्ग स्वीकारला आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मातोश्री या ठिकाणी दुपारी एक वाजता सिद्धार्थ खरात यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
मेहकरमधून विधानसभेसाठी उत्सुक
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवण्यास सिद्धार्थ खरात हे इच्छुक असल्याची माहिती आहे.
Siddharth Kharat : ठाकरे गटात नवा चेहरा, स्वेच्छानिवृत्त मंत्रालयीन अधिकाऱ्याच्या हाती शिवबंधन, विधानसभेची तयारी
विविध विभागांमध्ये काम
सिद्धार्थ खरात यांनी उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग, ग्राम विकास विभाग, गृह विभागामध्ये सहसचिव म्हणून काम केले आहे. राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री आणि केंद्रीय राज्य मंत्री यांचे खाजगी सचिव म्हणूनही सिद्धार्थ खरात यांनी कामे केली आहेत.
याशिवाय गृह, तुरूंग, उत्पादन शुल्क, शालेय शिक्षण, महसूल, पणन, कामगार, पशुसंवर्धन, दुग्ध, मत्स्यव्यवसाय, जलसंधारण, रोजगार हमी योजना, ऊर्जा आणि बंदरे यासारख्या विभागांच्या मंत्रीमहोदयांकडे विशेष कार्य अधिकारी / खाजगी सचिव म्हणूनही खरातांनी काम केले आहे.
तीस वर्षांच्या सेवेनंतर स्वेच्छानिवृत्ती
सहसचिव गृहविभाग मंत्रालय मुंबई येथून आपली ३० वर्षांची प्रदीर्घ प्रशासकीय सेवा पूर्ण केल्यानंतर एक जुलै २०२४ रोजी सिद्धार्थ खरात यांनी स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली आहे. त्यामुळे बुलढाणा गोवर्धन सभागृह, बुलढाणा अर्बनसमोर कारंजा चौक येथे त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचा ‘सेवागौरव सोहळा’ आयोजित करण्यात आला होता.