Sangli Assembly Constituency: सांगली विधानसभा मतदारसंघातील भाजपचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. तसेच आपण २०२४ची निवडणूक लढणार नसल्याचे गाडगीळ यांनी स्पष्ट केले आहे.
आ. गाडगीळ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका जाहीर होतील. या निवडणुकीसाठी पक्षाकडे उमेदवारी न मागण्याचा निर्णय मी घेतला आहे. राजकारणात कधी तरी थांबलं पाहिजे, या मताचा मी आहे. आमचा पक्ष सामान्य कार्यकर्त्यांच्या संघटनेतून बनला आहे. आमच्या संघटनेची कार्यपद्धती प्रथम देश, नंतर पक्ष आणि सर्वात शेवटी मी अशी आहे. मला पक्षाने दोनदा विधानसभा उमेदवारीची संधी दिली आता माझ्या ऐवजी अन्य कार्यकर्त्याला संधी द्यावी, असे माझं प्रामाणिक मत असल्याचे आ. गाडगीळ यांनी यांनी निवेदनात म्हटले आहे.
मी निवडणुकीच्या राजकारणातून थांबतोय, परंतु संघटनात्मक काम तसेच समाजकारण करत राहणार आहे. ज्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी खूप मेहनत घेतली, त्यांनी मला सांभाळले. मी त्यांना संभाळल मला इथपर्यंत आणले. त्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी भविष्याची मी अशाच पद्धतीने उभा राहणार आहे. सांगलीकर जनतेने जी मला सेवेची संधी दिली. सांगलीकर जनतेचे प्रेम व आशीर्वाद भविष्यातही माझ्यावर राहो, असा विश्वास आमदार सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त केला.
सांगली विधानसभा मतदारसंघात २००९ पासून भाजपचा उमेदवार विजय झाला आहे. २००९ साली येथून संभाजी पवार त्यानंतर २०१४ आणि २०१९ अशा सलग दोन निवडणुकीत सुधीर गाडगीळ यांनी बाजी मारली होती.