Mahayuti News: महायुतीत शिंदेच मोठे भाऊ? विविध सर्वेक्षणांमध्ये शिवसेना आघाडीवर असल्याचे चित्र

Mahayuti News: भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या तुलनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा आणि त्यांची शिवसेना दोन पावले पुढे असल्याची माहिती महायुतीमधील विविध सर्वेक्षणांमधून पुढे आल्याचे समजते.

हायलाइट्स:

  • आघाडीशी सामना करताना एकनाथ शिंदे चेहरा?
  • नागपूरमध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये मंथन
  • विभागनिहाय रणतीनीवरही सविस्तर चर्चा
महाराष्ट्र टाइम्स
shinde lead
मुंबई : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीकडून कोणी नेतृत्व करावे याविषयी आघाडीचे नेते चाचपणी करीत असताना महायुतीमध्ये मात्र भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या तुलनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा आणि त्यांची शिवसेना दोन पावले पुढे असल्याची माहिती महायुतीमधील विविध सर्वेक्षणांमधून पुढे आल्याचे समजते. त्यामुळे साहजिकच महाविकास आघाडीचा सामना करताना रणनीतीचा भाग म्हणून भाजप आणि राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुढे करण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू असल्याचे समजते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागपूर येथील शासकीय निवासस्थानी शनिवारी महायुतीच्या नेत्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार उपस्थित होते. मध्यरात्रीपर्यंत चालेल्या या बैठकीत महायुतीमधील तिन्ही पक्षांसाठी जागांसंदर्भात केलेल्या सर्वेक्षणाची माहिती संबंधित कंपन्याच्या प्रतिनिधींनी सादर केली. यावेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून खा. प्रफुल्ल पटेल तसेच खा. सुनील तटकरे, भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तर शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच उपस्थित होते.

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्यापूर्वी या तिन्ही पक्षांनी त्यांच्या त्यांच्या परीने सर्वेक्षण केले असून त्याचे अहवाल या बैठकीत मांडून त्याबाबत चर्चा करण्यात आली. महाविकास आघाडीला तोंड देताना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा मुकाबला करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काय रणनीती आखायला हवी, काँग्रेससोबत दोन हात करण्यासाठी विदर्भात काय खेळी खेळायला हवी याशिवाय मुंबई तसेच कोकणात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दोन पावले मागे टाकण्यासाठी कसे जागावाटप करायला हवे, याबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे समजते.
रामगिरीवर पहाटेपर्यंत महायुतीत खलबते; जागा वाटप कधी? बावनकुळेंनी थेट तारीखच सांगितली, म्हणाले…
गेल्या काही महिन्यांपासून विशेषत: लोकसभा निवडणुकीपासून भाजपच्या विरोधात विरोधकांनी चांगलेच रान पेटवले असून त्यांनी भाजपला कसे अडचणीत आणले आहे, याची उदाहरणे यावेळी सादर करण्यात आली. लोकसभा निवडणुकीत मराठा आणि ओबीसी वाद पेटल्यानंतर भाजपचे कसे नुकसान झाले, याविषयीचा आढावा घेण्यात आला. अद्यापही या परिस्थितीत बदल झाला नसून त्याचा कसा आणि कितपत फटका बसेल, याबाबतचे भाष्यही अहवालाच्या माध्यमातून या बैठकीत करण्यात आल्याचे समजते. शरद पवार यांच्या तुलनेत अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष अद्याप पाहिजे तेवढा मजबूत झालेला नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या आमदारांची संख्या कमी करायची असेल तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीशिवाय पर्याय नाही हे खरे असले तरी सध्याच्या घडीला तरी तुतारी ही घड्याळावर शिरजोर असल्याबाबतही या बैठकीत चिंतन करण्यात आल्याचे समजते.

‘लाडकी बहीण’चा लाभ होणार?

भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही ठिकाणी बऱ्यापैकी चालत असल्याची चर्चा या बैठकीत झाली. त्यामुळे विरोधकांचा सामना करताना शिंदे यांना कशा पद्धतीने पुढे करता येईल, त्याचा अपेक्षित परिणाम कसा साध्य करता येईल याविषयी चर्चा झाल्याचे समजते. राज्य सरकार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रसार करीत असले तरी आणि या योजनेला प्रतिसादही जोरदार मिळत असला तरीही मतदानात लाभ होईल की नाही याविषयी साशंकता व्यक्त करण्यात आल्याचे समजते. या योजनेसाठी पुढच्या महिनाभरात सरकारला मेहनत घ्यावी लागणार असल्याचे सुचविण्यात आल्याचेही समजते.

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

ajit pawarDevendra FadnavisEknath Shindeladki bahin yojnamahayuti governmentshivsena shinde groupVidhan Sabha Elections 2024मराठी बातम्यामहाराष्ट्र राजकीय बातम्यामुंबई बातम्या
Comments (0)
Add Comment