महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 4 Sept 2024, 9:42 pm
अखेर भक्तांना गणराय पावले असेच म्हणावे लागले कालपासून सुरु असलेला एसटी संप अखेर आज एसटी कर्मचाऱ्यांने मागे घेतला आहे.
मुंबई : ऐन गणेशोत्सवाच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी प्रवाशांचे हाल सुरु झाले होते. दोन दिवस प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. पण आज अखेर एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळात राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. एसटी कर्मचारी संघटनांनी मंगळवारी अघोषित संप पुकारल्याने राज्यभरातील प्रवाशांचे हाल झाले होते. आज, बुधवारी राज्यात गणेशोत्सावामुळे १,००६ उत्सव विशेष जादा गाड्या चालवण्याचे नियोजन एसटी महामंडळाने केले होते. यामुळे नियमित फेऱ्यांसह विशेष फेऱ्यांमधील प्रवाशांच्या चिंतेत भर पडली. एसटी चालक-वाहकांअभावी अनेक स्थानक-आगारांत गाड्या उभ्या असल्याने संपाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच काल महामंडळाला सुमारे १४ कोटींच्या महसुल तोटा सहन करावा लागला आहे. आज काही वेळापूर्वीच एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला अशी घोषणा केली आहे.