Jaydeep Apte News: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्याप्रकरणातील आरोपी शिल्पकार जयदीप आपटे याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याला कल्याण येथील घरातून अटक केली आहे.
कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या टीमने जयदीप आपटेला त्याच्या कल्याणमधील घरातून ताब्यात घेतले. पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर त्याला दोन आठवड्यांनी अटक करण्यात पोलिसांना यश आले.
महाराजांच्या पुतळा कोसळल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता यांनी या प्रकरणाची फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणात दुसरा आरोपी जयदीप आपटे गायब होता. त्याचा मोबाईल देखील बंद असल्याने पोलिसांना त्याचा ठाव ठिकाणा सापडत नव्हता. मालवण पोलिसांनी ठाण्यात हजर राहण्यासाठी नोटीस देखील बजावली होती. मात्र त्यानंतर देखील तो हजर राहिला नव्हता. या प्रकरणातील अन्य एक आरोपी चेतन पाटील हा कोल्हापूर पोलिसांना शरण आला होता. त्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी त्याला मालवण पोलिसांच्या ताब्यात दिले होते. चेतन पाटील याला न्यायालयाने ५ सप्टेंबरपर्यंतची पोलीस कोठडी दिली आहे.
राजकोट किल्लापरिसरात उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली होती. या घटनेनंतर घटनास्थळी राणे समर्थक आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते यांच्यात राडा देखील झाला होती. तर विरोधी पक्षांनी राज्यभरात आंदोलन केले होते. विशेष म्हणजे राज्यातील महायुती सरकारमध्ये असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने देखील मूक आंदोलन केले होते.