Chh. Sambhajinagar-Beed E-Bus: एसटीच्या ताफ्यामध्ये बहुप्रतिक्षित ई-बसचा पुरवठा सुरू झाला आहे. सिडको आगारात नवीन दहा ई-बस दाखल झाल्या आहेत. सर्व दहा ई-बस ही छत्रपती संभाजीनगर ते बीड मार्गावर विनावाहक वाहतुकीसाठी वापरण्यात येणार आहेत.
काही वर्षांत एसटी महामंडळाने नवीन बस गाड्यांची खरेदी बंद केली. एसटी महामंडळात असलेल्या गाड्यांची पुनर्बांधणी करून या बस प्रवासी वाहतुकीसाठी वापरण्यात येत होत्या. दोन वर्षांपूर्वी एसटी झालेल्या आंदोलनामुळे अनेक बस गाड्यांचे मेनटेन्सही झालेले नव्हते. यामुळे सध्या एसटी प्रवाशांना खराब आणि खिळखिळ्या झालेल्या बसमधून प्रवास करावा लागत आहे. दरम्यानच्या काळात ई-शिवाई या इलेक्ट्रिक बसचा प्रयोग राबविण्यात आला. या बस सध्या छत्रपती संभाजीनगर ते पुणे मार्गावर सुरू आहेत. या बसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद चांगला असल्यामुळे एसटी प्रवाशांना चांगली सेवा मिळावी. यासाठी पाच हजार ई-बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या पाच हजार ई-बससाठी एसटी महामंडळाच्या जागेवर संबंधित ई-बस कंत्राटदाराला ई-बस चार्जिंग हब उभारण्यासाठी जागा देण्यात आली आहे.
ई-बस चार्जिंग हबचे काम सूरू असताना, काही दिवसांपासून राज्यभरात विविध विभागांना ई-बसचा पुरवठा करण्यात येत आहे. सिडको आगारासाठी एकूण दहा ई-बस देण्यात आलेले आहे. या बस छत्रपती संभाजीनगर ते बीड मार्गावर विनावाहक चालविण्यात येणार आहे. आगामी दहा ते बारा दिवसांत ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती एसटी विभागाकडून देण्यात आली आहे.
अशी आहे ई-बस
- सिडको विभागात दाखल ई-बसची प्रवासी क्षमता ३५ आहे.
- बसची रुंदी नऊ मीटर आहे.
- लक्झरी बसप्रमाणे या बसना मोठ्या काचा आहेत.
- ही बस वातानुकुलित आहे.
- प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व साहित्य; तसेच उपकरणे बसमध्ये उपलब्ध आहेत.
थोडीशी होणार अडचण
एसटी विभागाने भाडेतत्त्वावर घेतलेल्या नऊ मीटर रुंदीच्या बसमध्ये दोन्ही बाजूच्या सीटमधुन प्रवाशांना जाण्यासाठी असलेली जागा ही खूपच कमी आहे. या जागेतून एकच प्रवासी जाऊ शकतो. त्यामुळे प्रवाशांची अडचण होणार आहे.
पुश बॅक सीट नसल्याचाही फटका
एसटी विभागाने प्रवाशांच्या गरजेनुसार, एसटीच्या गाड्यांमध्ये पुशबॅक सीटची व्यवस्था उपलब्ध करून दिलेली आहे. मात्र, भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या या बसमध्ये पुशबॅक सीट देण्यात आलेल्या नाहीत. यामुळे नऊ मीटरच्या या बस कमी अंतरासाठी वापरावी लागणार आहे. लाँग रूटसाठी या गाड्या प्रवाशांसाठी अडचणीच्या ठरतील, अशीही माहिती एसटी सूत्रांनी दिली.
आणखी पाच शिवाई येणार
एसटी महामंडळाने छत्रपती संभाजीनगर ते पुणे मार्गावर शिवाई बस सुरू केली आहे. ही बसही इलेक्ट्रीक बस आहे. या बसला एसटीच्या प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. मात्र, या बसची संख्या सध्या कमी आहे. तसेच शिवशाही या मार्गावर चालविण्यात येत आहे. शिवाई व शिवशाही या दोन्ही बस असूनही प्रवाशांची संख्या जास्त असल्याने, बससाठी वेटींगवर राहावे लागत आहे. यामुळे या मार्गावर आणखी शिवाई वाढविण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार पाच शिवाई बस पुणे मार्गावर सूरू केले जाणार आहे.
चार्जिंग स्टेशनच्या कामाचा वेग वाढविला
सिडको आगारात ई बस चार्जिंग हबच्या कामाला सुरुवात करण्यात आली. या ठिकाणी एका बाजूला काँक्रिटीकरण पूर्ण करण्यात आलेले आहे. या नियोजित जागेवर काँक्रिटीकरण सुरू करण्याचे काम सूरू असताना, ई-बसचा पुरवठा सुरू झालेला आहे. यामुळे नियोजित जागेवर काँक्रिटीकरण न करता, पेव्हर ब्लॉक लावून ई-बस चार्जिंग स्टेशनसाठी चार्जिंग पॉइंट तयार करण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी शेड तयार करण्यात येत आहे. हे काम आगामी पाच ते आठ दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.