Namami Goda Project : या सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील ‘नमामी गंगे’च्या धर्तीवर नाशिकमध्ये ‘नमामी गोदा’ प्रकल्प राबविण्याची योजना आहे
शहरातील खड्डे बुजविण्यासह डेंग्यूच्या नियंत्रणासाठी भाजपच्या आमदारांनी आठ दिवसांचा ‘अल्टिमेटम’ दिलेला असतानाच आयुक्तांसह शहर अभियंतादेखील दिल्ली दौऱ्यावर गेल्याने शहरातील खड्डे कोणाच्या भरवशावर बुजवायचे, आरोग्यविषयक उपाययोजना कशा करायच्या, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सन २०२७-२८ मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ होत आहे. या सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील ‘नमामी गंगे’च्या धर्तीवर नाशिकमध्ये ‘नमामी गोदा’ प्रकल्प राबविण्याची योजना आहे. तीन वर्षांपूर्वी या प्रकल्पाची संकल्पना तत्कालीन सत्तारूढ भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र व राज्य शासनाकडे मांडल्यानंतर या प्रकल्पाला तत्त्वतः मान्यता देत केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने १,८०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देशही महापालिकेला देण्यात आले होते.
सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रियेद्वारे खासगी सल्लागार संस्थेची नियुक्तीदेखील केली. या सल्लागार संस्थेने २,७८० कोटींचा प्रकल्पाचा प्रारूप आराखडा आयुक्तांना सादर केला. त्यानंतर छाननी करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार नसल्याने पालिकेने ठेकेदाराला आठ दिवसांचा ‘अल्टिमेटम’ दिला. या पार्श्वभूमीवर आता महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे यांच्यासह मलनिस्सारण विभागाचे अधिकारी बुधवारी दिल्लीला रवाना झाले. जलशक्ती मंत्रालयाच्या प्रधान सचिवांनी आज, गुरुवारी (दि. ५) बैठक बोलावल्यामुळे आयुक्तांसह अर्धा डझन अधिकारी दिल्लीला रवाना झाले आहेत. परिणामी पालिकेचे कामकाज ठप्प झाले आहे.
‘अल्टिमेटम’ वाऱ्यावर
शहरातील रस्त्यांवर पाच वर्षांत हजार कोटींची उधळपट्टी झाल्यानंतरही पावसाळ्यात रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे भाजप आमदार प्रा. देवयानी फरांदे, अॅड. राहुल ढिकले यांनी मंगळवारी पालिका आयुक्तांसह अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. डेंग्यूसह साथरोग बळावल्याने नाशिककरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंदर्भातील उपाययोजनांसाठी भाजपच्या आमदारांनी आठ दिवसांचा ‘अल्टिमेटम’ दिल्यानंतर आयुक्तांसह शहर अभियंता रस्त्यावर उत्तरणे अपेक्षित होते. परंतु, आयुक्तांसह शहर अभियंतादेखील दिल्लीला रवाना झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आयुक्त आणि प्रमुख अधिकारी बुधवार, गुरुवार व शुक्रवार असे तीन दिवस दिल्लीमध्ये राहणार आहेत. त्यानंतर शनिवारी व रविवारी शासकीय सुट्टी असल्यामुळे आता प्रमुख अधिकारी सोमवारीच महापालिकेमध्ये येणार असल्याने भाजप आमदारांचा ‘अल्टिमेटम’ बारगळणार असल्याची चिन्हे आहे.