Pune Congress Ravindra Dhangekar: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुणे काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे पक्षातील आमदाराबाबत तक्रार केली असून त्यांना विधानसभेला उमेदवारी देण्याबाबत विचार करावा, अशी थेट मागणी केली आहे.
काँग्रेस पक्षाची पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक काल पुण्यातील काँग्रेस भवन येथे पार पडली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ नेत्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी वरिष्ठांकडे काही विशेष मागणी केली आहे. आतापर्यंत तुम्ही ज्यांना उमेदवारी दिली, त्यांनी फ्लेसवर आपल्या वरिष्ठ नेत्यांचा फोटो छापला का? तो व्यक्ती काँग्रेस पक्षाच्या विचाराशी एकरूप आहे का? जर नसेल तर त्या उमेदवाराबाबत आपण विचार करावा, असे म्हणत अरविंद शिंदेंनी रविंद्र धंगेकरांबाबत खदखद व्यक्त केली आहे.
काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, जो कोणी सोनिया गांधी मल्लिकार्जुन खर्गे राहुल गांधी यांचे फोटो लावणार नाही, अशांना उमेदवारी देऊ नका. व्यक्तिगत राजकारण करणाऱ्यांना पक्ष संधी देणार नाही, काँग्रेस विचाराशी एकरूप नसणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी केली. शहराध्यक्षांचा रोख थेट कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्याकडे होता.
माझा रोख काँग्रेसमधील कोणी एका व्यक्तीकडे नाही तर शहरात असा कोणी काँग्रेस नेता असेल कोणी पदाधिकारी हे काँग्रेस बैठक किंवा आंदोलनला ५० टक्के उपस्थितीत नसतील त्यांना उमेदवारी देताना नक्कीच विचार केला जावा, असे मत अरविंद शिंदे यांनी व्यक्त केले आहे.