Palghar Triple Murder : पालघरमधील नेहरोली गावात आई व मुलीचा मृतदेह बंद पेटीत, तर वडिलांचा मृतदेह बाथरुममध्ये सापडला होता.
मूळचे गुजरात येथील असलेले राठोड कुटुंब नेहरोलीतील बोंद्रे आळीत गेल्या २० वर्षांपासून राहत होते. कुटुंबात मुकुंद बेचरदास राठोड (७५), पत्नी कांचन मुकुंद राठोड (७२) आणि मुलगी संगीता मुकुंद राठोड (५२) होते. त्यांची दोन्ही मुलं नोकरीनिमित्त बाहेरगावी राहतात. जवळपास दहा-बारा दिवसांपासून आई-वडिलांसोबत कुठलाच संपर्क होत नसल्याने त्यांचा मुलगा गावात आला.
दार उघडताच तिघांचे मृतदेह
१८ ऑगस्टपासून कुणाशी संपर्क होत नसल्याने राजकोट येथे फॅब्रिकेशन व्यवसाय करणारा त्यांचा मुलगा सुहास शोध घेण्यासाठी गावी आला. घराला बाहेरून कुलूप असल्याने कुटुंब आजारी असल्याच्या चिंतेने सुहासने आजूबाजूचे सर्व दवाखाने पालथे घातले. तरीही कुठेच त्यांचा शोध लागत नसल्याने अखेर घरातील काही कागदपत्रे काढण्यासाठी त्याने कुलूप फोडले, तेव्हा घरात अंगाचा थरकाप उडवणारे दृश्य दिसले. अनेक दिवसांपासून मृतदेह पडून असल्याने ते कुजले होते. मृतदेहांची दुर्गंधी बाहेर जाऊ नये, यासाठी मृतदेहांवर जाड गाद्या टाकण्यात आल्या होत्या.
कसा झाला उलगडा?
मुकुंद राठोड यांनी नेहरोलीत एक जागा घेऊन इमारत बांधली होती. या इमारतीत ते कुटुंबासह राहत होते आणि भाडेकरुंनाही त्यांनी जागा दिली होती. यापैकी आरिफ हा मूळचा उत्तर प्रदेशातील असलेला भाडेकरु घटना उघडकीस आल्याच्या दिवसापासून गायब होता. त्यामुळे त्याच्यावर संशय व्यक्त केला जात होता.
पालघरमधील आई-वडील लेकीच्या हत्येचं गूढ अखेर उकललं, मारेकरी निघाला जवळचाच
एकामागून एक तिघांची हत्या
राठोडांच्या घरात पैशांचं घबाड मिळण्याच्या हव्यासातून त्याने आधी मुलगी संगीता आणि नंतर तिच्या आईवर लोखंडी रॉडने वार करुन हत्या केली. त्यानंतर दोघींचे मृतदेह पत्र्याच्या पेटीत ठेवले. घटनेच्या वेळी मुकुंद बाहेर होते. त्यामुळे आरिफ घरातच त्यांची वाट पाहत होता. ते घरात शिरताच दबा धरुन बसलेल्या आरिफने त्यांच्यावरही रॉडने हल्ला चढवला. त्यांचा मृतदेह बाथरुममध्ये तसाच फेकून त्याने पोबारा केला. वाडा पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी पाच पथकं रवाना केली होती. मूळगाव उत्तर प्रदेशातून त्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले.