Devendra Fadnavis Nagpur Constituency: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ला परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून राज्यातील राजकारण अद्याप थांबलेले दिसत नाही. काँग्रेसकडून आता थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात पोस्टर लावण्यात आले आहेत.
नऊ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकोट किल्ल्यावर बांधलेल्या पुतळ्याचे अनावरण केले होते. ऑगस्टच्या महिन्यात मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला . पुतळा पडण्याच्या घटनेमुळे राज्यातील राजकारण तापले. विरोधी महाविकास आघाडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला. इतकेच नाही तर विरोधकांनी पुतळा उभारणीत घोटाळा झाल्याचा आरोपही केला. मात्र, या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्य सरकारने राज्यातील जनतेची माफी मागितली. एवढेच नाही तर किल्ल्यात पुन्हा भव्य पुतळा बसवण्याची घोषणा करण्यात आली.
मात्र असे असतानाही विरोधकांचे आंदोलन सुरूच आहे. या घटनेवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांच्या निशाण्यावर आहे. महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोंडीत पकडण्यात व्यस्त आहे. याच अनुषंगाने काँग्रेस नेते प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघात पोस्टर लावले आहे. ज्यात “महाराज आम्हाला माफ करा” असे लिहिले आहे. शहरातील ओंकार नगर चौक ते छत्रपती चौक दरम्यान रिंग रोड वर हे पोस्टर्स-बॅनर लावण्यात आले आहे.
राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहे. प्रफुल्ल गुडधे पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक लढवतील असे वाटत आहे. प्रफुल गुडधे पाटील यांनी 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांचा विरोधात निवडणूक लढवली होती. त्यात देवेंद्र फडणवीस यांनी गुडधे पाटील यांचा पराभव केला होता. त्यामुळे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर सातत्याने हल्लाबोल करत आहे. आरक्षणाबाबत मराठा समाजात देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात रोष आहे. मनोज जरांगे पाटील हे सातत्याने फडणवीसांना खलनायक म्हटले आहे.