Assembly Elections 2024: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने सावध पवित्रा घेत रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. लोकसभेत अहमदनगर जिल्ह्यातील दोन जागाभाजपच्या हातातून गेल्या होत्या आता विधानसभेसाठी थेट अमित शहा यांनी सूत्रे हाती घेतली आहेत.
लोकसभेचा अनुभव लक्षात घेता महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपने आणखी जोर लावण्याचे धोरण अवलंबल्याचे दिसते. खुदद शहा यांनीच राज्यात लक्ष घातल्याचे सांगण्यात येते. त्यासाठी त्यांच्या विश्वासातील गुजरातमधील आमदार आणि पदाधिकारी त्यांनी महाराष्ट्रात पाठविले आहेत. नाशिकमध्ये अलीकडेच भाजपचे नियोजन बैठक झाली. त्या बैठकीतही गुजरातमधील काही नेते उपस्थित होते. तेथेच नगरचेही नियोजन करण्यात आल्याचे सांगण्यात येते. जिल्ह्यातील सर्व मतदारसंघासाठी एका आमदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. हे आमदार आतापासूनच मतदारसंघात मुक्काम ठोकून नियोजनाचे काम करणार आहेत.
त्यानुसार संगमनेर व अकोले तालुक्यासाठी नियुक्त केलेले आमदार जगदीश मकवाणा आणि आमदार किशोरीलाल बेनिवाल आपल्या सहकाऱ्यांसह येथे दाखल झाले आहेत. स्थानिक पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधून ते नियोजन करणार आहेत. संगमनेर हा थोरातांचा मतदारसंघ भाजपच्या स्थानिक नेत्यांही प्रतिष्ठेचा केला आहे. काँग्रेसचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख होत असलेले बाळासाहेब थोरात यांचा हा मतदारसंघ असला तर यावेळी त्यांची कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे आपण संगमनेर किंवा राहुरीतून निवडणूक लढवू शकतो, असे भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पूर्वी एकदा म्हटले होते.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा शिर्डी मतदारसंघ आहे. मात्र, तेथे थोरात यांनी लक्ष घातले आहे. तर दुसरीक़डे विखे पाटील यांनीही गेल्या अनेक वर्षांपासू संगमनेरमध्ये लक्ष घातले आहे. या पार्श्वभूमीवर आता भाजपचे थेट गुजरातचे आमदार नियोजनासाठी या मतदारसंघात पाठविण्यात आले आहेत. आता यावर थोरात यांचा काय प्रतिक्रिया येते, याकडे लक्ष लागले आहे.