Majhi Ladki Bahin Yojana Poster: महायुती सरकारमध्ये असलेल्या तिन्ही पक्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने श्रेय घेण्यावरून वाद सुरू आहे. राष्ट्रवादीकडून या योजनेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न झाल्यावरून आता बारामतीत लावण्यात आलेला फ्लेक्स चर्चेत आला आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना जाहीर झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच त्याचे सर्व श्रेय घेत असल्याची भावना महायुतीतील अन्य पक्षांच्या पदाधिकाऱयांची झाली आहे. त्यातून हा फ्लेक्स लावला गेला असावा, असे बोलले जात आहे.
शहरातील मोरगाव रस्त्यावर एका होर्डींगवर देवाभाऊंचा फ्लेक्स लावण्यात आला आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री शिंदे यांनाही स्थान देण्यात आले आहे. शिवाय महापुरुषांचे फोटो लावण्यात आले आहेत. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोटोला फ्लेक्सवर स्थान देण्यात आलेले नाही. त्यांचा फोटो वगळून हा फ्लेक्स लावला कोणी, याची चर्चा आता शहरात सुरु आहे. विशेष म्हणजे फ्लेक्स उभारणाऱयाचे नाव त्यावर नाही.
गेल्या दोन दिवसांपूर्वी शहरात राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा पार पडली. त्यावर उपमुख्यमंत्र्यांसह राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांचे फोटो लावत योजनेचे प्रमोशन करण्यात आले. शहरभर गुलाबी फ्लेक्स लावण्यात आले. आता त्यांचाच फोटो वगळून लावण्यात आलेल्या या फ्लेक्सबद्दल उलटसुलट चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादीला चिमटा घेण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
नागपूरमधील पोस्टरची चर्चा
महायुतीत लाडकी बहिण योजनेवरून सुरू असलेल्या श्रेयवादावरून वाद सुरू असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर मतदारसंघात मालवण येथील राजकोट किल्ला परिसरात झालेल्या घटनेवरून पोस्टर लावण्यात आले आहेत. काँग्रेसचे नेते प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी हे पोस्टर लावले असून ज्यात “महाराज आम्हाला माफ करा” असे लिहिले आहे.
दरम्यान, लाडकी बहिण योजनेच्या पोस्टरबाबत फडणवीस यांनी एक एसओपी तयार करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. महायुतीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप यांच्या जाहिरातीत सरकारमधील अन्य पक्षांच्या नेत्यांचे फोटो नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली होती.