Vidhan Sabha Election : एकीकडे राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले असतानाच राज्यातील जनतेला तिसऱ्या आघाडीचा पर्याय मिळण्याची शक्यता आहे. खुद्द सभांजीराजेंनी तिसरी आघाडीचा पर्याय जनतेसमोर ठेवला आहे.
छत्रपती संभाजीराजे म्हणाले,”राज्यातील राजकरण नळावरील भांडण असल्यासारखे सुरु आहे. सर्व राजकरण वैयक्तिक द्वेषातून सगळे सुरु आहे. लोकसभेत लोकशाही धोक्यात आहे असे बोलून महाविकास आघाडीने मत मिळवली पण जेव्हा खरंच संविधानाला धोका असतो तेव्हा महाविकास आघाडी भूमिका घेत नाही. वक्फ बोर्ड,अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा प्रश्नांवर आघाडीकडून केंद्र सरकारला प्रश्न विचारला जात नाही”. असा नाराजीचा सूर संभाजीराजे यांनी बोलून दाखवला. यासाठीच आपण राज्यात तिसरी आघाडी देत असल्याचे संभाजीराजे यांनी बोलून दाखवले.
मनोज जरांगेंशी सकारात्मक चर्चा, विधानसभेला राज्यात तिसरा पर्याय देणार : छत्रपती संभाजीराजे
लोकसभेतील निकालावरुन जर कोणाला वाटत असेल विधानसभेत पुढे जावू तर साफ चुकीचे आहे. महाराष्ट्र खऱ्या अर्थाने सुसंस्कृत राहिला का? याचे आत्मचिंतन करायची वेळ आली आहे. आम्ही सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी एक पाऊल टाकत आहोत. बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू राजरत्न आंबेडकर आमच्या सोबत आले आहेत. आम्ही मराठा नेते मनोज जरांगे पाटील, प्रहार संघटनेचे बच्चू कडू,राजू शेट्टी यांच्यासोबत सकारात्मक बोलणी करत आहोत. राज्यात कसा वेगळा पर्याय देता येईल यावर चर्चा सुरु झाली आहे. राज्यातील जनतेला आम्ही नवा पर्याय देणार आहोत. जरांगे पाटील योग्य तो निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. राज्यातील ओबीसी नेत्यांसोबत सुद्धा बोलणी सुरु झाली आहे. असे मत संभाजीराजे यांनी बोलून दाखवले आहे.