Gadchiroli News: गडचिरोलीतील दोघा मुलांच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे. या मुलांना मांत्रिकाकडे घेऊन केल्याचे समोर आल्यानंतर आईवडिलांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार होते. मात्र त्यांनी रुग्णालयात जाताना दोघांचा मृत्यू झाल्याचा दावा केला. या संदर्भात आता शवविच्छेदन अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दोन मुलांचा तापाने मृत्यू झाल्यानंतर आईवडील त्यांचे मृतदेह १५ किमी खांद्यावर घेऊन गेले. या घटनेची दखल घेत गुरुवारी जिल्हा परिषद प्रशासनाने या संपूर्ण प्रकाराची चौकशी सुरू केली. मृत्यूपूर्वी दोन्ही मुलांना मांत्रिकाकडे नेण्यात आले असल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तयारीही सुरू करण्यात आली. पण, मृत मुलांच्या आईवडिलांनी आपण मांत्रिकाकडे गेलो नाही. जिमलगट्टाच्या रुग्णालयात जाण्यासाठी निघालो. वाटेतच दोघांचा मृत्यू झाला, असा दावा केल्याने घटनेचे गूढ वाढले आहे.
अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील येरागड्डा येथील बाजीराव रमेश वेलादी (०६) आणि दिनेश रमेश वेलादी (साडेतीन वर्षे) हे दोघेही आजोळी पत्तीगावला आले होते. दोन दिवसांपूर्वी त्यांना ताप आला. दीड तासांच्या अंतराने दोन्ही भावंडांचा मृत्यू झाला. तरीही आईवडिलांनी जिमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. डॉक्टरांनी तपासून दोघांनाही मृत घोषित केले. आईवडिलांनी दोन्ही मुलांचे मृतदेह खांद्यावर घेऊन गाव गाठले.
यासंदर्भातील वृत्त प्रकाशित होताच आरोग्य विभागाने गुरुवारी सकाळी रुग्णवाहिका पाठवून दोन्ही भावांचे मृतदेह अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणले. त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर गडचिरोलीहून जिल्हा आरोग्य अधिकारी प्रताप शिंदे यांनी जिमलगट्टाच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन चौकशी सुरू केली. आरोग्य केंद्राचे अधिकारी, कर्मचारी आणि काही नागरिकांशीही त्यांनी संवाद साधला. अन्न, औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. आर्थिक मदतही केली.
काय झाले होते?
बाजीराव रमेश वेलादी आणि दिनेश रमेश वेलादी दोघांना दोन दिवसांपूर्वी ताप आला होता. दोघांची प्रकृती बिघडल्याने त्याना पत्तीगाव येथील एका पुजाऱ्याकडे नेण्यात आले होते. संबंधित पुजाऱ्याने दोघांना जडीबुटी दिली, पण त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. सकाळी साडेदहाच्या सुमारास बाजीराव आणि दुपारी १२ वाजता दिनेश मृत्यू झाला. जिमलगट्टा आरोग्य केंद्रातून पत्तीगावला जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने या दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह खांद्यावर घेऊन आईवडिलांना नाल्याच्या पाण्यातून व चिखलातून वाट काढण्याची वेळ आली.