Ladki Bahin Yojana: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या पोर्टलवर सातारा जिल्ह्यातील प्रतीक्षा पोपट जाधव या महिलेच्या नावाने विविध आधार क्रमांकाद्वारे सुमारे ३० अर्ज केल्याचे समोर आले.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या पोर्टलवर सातारा जिल्ह्यातील प्रतीक्षा पोपट जाधव या महिलेच्या नावाने विविध आधार क्रमांकाद्वारे सुमारे ३० अर्ज केल्याचे समोर आले. प्रतीक्षाने सर्व अर्जांवर एकाच बँक खात्याची माहिती भरलेली होती, मात्र या खात्यात २९ ऑगस्ट रोजी एकदाच तीन हजार रुपये जमा झाले आहेत. तिने ‘गुगल’वरून वेगवेगळ्या आधार क्रमांकाची माहिती मिळवून त्यांचा वापर केला. महिला व तिचा पती यांच्याविरुद्ध वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
महिला बाल व विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिवसभर या प्रकरणाची चौकशी केली. त्यानंतर बोगस अर्ज भरून पैसे लाटल्याचा प्रकार उघडकीस आला. महिला आणि बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या आदेशानुसार, संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘साताऱ्यातील महिलेने अनेक बोगस अर्ज दाखल करून सरकारची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. अर्ज तपासण्याच्या सॉफ्टवेअरमध्ये आणखी काही बदल करता येईल का याचाही आम्ही गांभीर्याने विचार करीत आहोत. प्रत्येक अर्जाची छाननी केली जाईल. आधार क्रमांक कोणत्या बँकेशी जोडला आहे, याचीही चौकशी होणार आहे. तालुका, जिल्हा; तसेच जिल्हा प्रशासनाकडून पुनर्तपासणी करण्याशिवाय आणखी काही निकषांद्वारे अर्जांची तपासणी करण्यात येणार आहे’, असेही डॉ. नारनवरे यांनी स्पष्ट केले.
राज्यात जुलैपासून ही योजना सुरू आहे. योजनेंतर्गत दोन कोटी ४० लाखांहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. यापैकी सुमारे दीड कोटी लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली. राज्य सरकारने योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत महिन्याने वाढविली आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात अर्ज येण्याची शक्यता आहे.