Pune Crime News: पोलिसांनी या प्रकरणी मंगळवारी तीन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले असून, बाल न्याय मंडळाने त्यांना चौदा दिवस बाल निरीक्षणगृहात ठेवण्याचा आदेश दिला आहे.
हायलाइट्स:
- आंदेकर खून प्रकरणी तपासाचा आवाका मोठा
- दहा आरोपींना पोलिस कोठडी
- ‘केस डायरीत त्रुटी नसाव्यात’
नेमकं काय घडलं होतं?
वनराज आंदेकर यांचा रविवारी रात्री नाना पेठेत पिस्तुलातून गोळ्या झाडून; तसेच कोयत्याने वार करून खून करण्यात आला. त्यांचे वडील बंडू उर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर (वय ६८, रा. नाना पेठ) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी आतापर्यंत पंधरा आरोपींना अटक केली आहे, तर दोघांचा पोलिस शोध घेत आहेत. आंदेकर यांचा खून करण्यासाठी आरोपींनी वापरलेले पिस्तूल आणि कोयते अद्याप जप्त करण्यात आलेले नाहीत, आरोपींनी हत्यारे कोठून व कोणाकडून आणली आहेत, त्याचा तपास केला जात आहे. आरोपींनी कट रचून हा गुन्हा केला आहे. त्याच्या तपासासाठी आरोपींना चौदा दिवसांची पोलिस कोठडी आवश्यक आहे, अशी माहिती तपास अधिकारी व गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक शबीर सय्यद यांनी न्यायालयात दिली. आपसांत नियोजित कट करून आंदेकर यांचा निर्घृणपणे खून केल्याचा आरोप आरोपींवर आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील नीलिमा इथापे-यादव यांनी केला. आरोपींच्या वतीने ॲड. एस. बी. रसाळ आणि ॲड. तृप्ती सावंत आणि विधी सेवा प्राधिकरणाच्या ॲड. ज्योती इंजे, ॲड. विजय लेंगरे यांनी युक्तिवाद केला.
अटक आरोपींची नावे
अनिकेत ज्ञानेश्वर दुधभाते (वय ३१), तुषार अंकुश कदम (वय ३०, दोघेही रा. आंबेगाव पठार), दीपक किसन तोरमकर (वय २९), आकाश बापू म्हस्के (वय २४, सर्व रा. आंबेगाव पठार), समीर किसन काळे (वय २६, रा. येवलेवाडी), विवेक प्रल्हाद कदम (वय २५, रा. आंबेगाव पठार), उमेश नंदू किरवे (वय २६, रा. आंबेगाव पठार), ओम धनंजय देशखैरे (वय २०, रा. आंबेगाव पठार), साहिल बबन केंदळे (वय २०, रा. दत्तनगर), अजिंक्य गजेंद्र सुरवसे (वय १९, रा. आंबेगाव पठार) अशी मंगळवारी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या पूर्वी या गुन्ह्यात प्रकाश लक्ष्मण कोमकर (वय ५१), संजीवनी कोमकर (वय ४४, दोघेही रा. नाना पेठ), गणेश लक्ष्मण कोमकर (वय ३७), जयंत लक्ष्मण कोमकर (वय ५२, दोघेही रा. भवानी पेठ) आणि सोमनाथ सयाजी गायकवाड (वय ४१, रा. आंबेगाव पठार) यांना अटक करण्यात आली आहे.
‘केस डायरीत त्रुटी नसाव्यात’
या गुन्ह्याचा केस डायरीत तांत्रिक त्रुटी असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. त्यावर कायद्यात असलेल्या नियमांनुसार केस डायरी तयार करण्यात यावी. तपासाची माहिती देणाऱ्या बाबी त्यात क्रमानुसार असाव्यात, अशी सूचना न्यायालयाने पोलिसांना केली.