‘लाडकी बहीण’वरून मंत्रिमंडळात खडाजंगी, शिवसेना-राष्ट्रवादीत वाद

Mahayuti Dispute Over Ladki Bahin Yojana: महायुतीत ‘लाडकी बहीण’ योजनेच्या श्रेयवादावरुन मंत्रिमंडळात जोरदार वाद झाल्याची माहिती आहे. यावेळी शिवसेनेकडून राष्ट्रवादीवर लाडकी बहीण योजनेचं चुकीचं नाव वापरल्याबद्दल आक्षेप घेण्यात आला.

महाराष्ट्र टाइम्स
लाडकी बहीण योजना
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: ‘लाडकी बहीण’ योजनेवरून राज्यभरात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच या योजनेच्या श्रेयवादावरून गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीतच जोरदार वाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ऐवजी ‘माझी लाडकी बहीण योजना’ हे नाव वापरण्यात येत असल्याबद्दल शिवसेनेने तीव्र आक्षेप नोंदवला.

आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. या बैठकीत अनेक घोषणांचा पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, या बैठकीत ‘लाडकी बहीण’ योजनेवरून महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आमने-सामने आल्याचे समजते.

गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसकडून या योजनेचा प्रचार करताना ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ असे नाव न वापरता ‘माझी लाडकी योजना’ असे नाव सर्रास वापरले जात असल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. त्यावरून शिवसेना मंत्र्यांनी थेट नाराजी व्यक्त केली. या योजनेचे नाव बदलणे हा चुकीचा प्रकार आहे. यामुळे विरोधकांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो. आगामी निवडणुका लक्षात घेता त्याचा फटका बसू शकतो, अशी भीती शिवसेनेच्या मंत्र्यांकडून व्यक्त करण्यात आली. या मुद्यावरून बैठकीत जवळपास अर्धा तास नाराजीनाट्य रंगल्याची माहितीही महायुतीतील मंत्र्यांकडून नाव न छापण्याच्या अटीवर देण्यात आली. या नाराजीनाट्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याबाबत खंत व्यक्त केल्याचे कळते. मुख्यमंत्री शिंदे यांनीही यासंदर्भात मंत्र्यांना कानपिचक्या दिल्याचे कळते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. अशाप्रकारे चुकीचा संदेश बाहेर जाऊ नये, यासाठी सर्वच मंत्र्यांनी काळजी घ्यावी, अशी सूचना त्यांनी केल्याचे समजते.

योजनेचा आढावा

मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच या योजनेबाबत अनेक सूचनाही करण्यात आल्या आहेत. आत्तापर्यंत झालेल्या नोंदणी आणि त्यासंदर्भातील माहितीचे बैठकीत सादरीकरण करण्यात आले.

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

mahayuti disputemukhyamantri ladki bahin yojana namemumbai live newsshivsena vs ncpमहायुती सरकारमहायुतीत लाडकी बहीणवरुन वादमुख्यमंत्री एकनाथ शिंदेलाडकी बहीण योजना वादशिवसेना राष्ट्रवादीत वाद
Comments (0)
Add Comment