Pune Dams are full due to heavy rain: पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, टेमघर, पानशेत आणि वरसगाव या प्रकल्पांतील चारही धरणांच्या परिसरात अधूनमधून पावसाने हजेरी लावली. त्यामुळे धरण प्रकल्पातील चारही धरणे ‘फुल्ल’ झाली आहेत. यामुळे पुणेकरांच्या वर्षभर पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
खडकवासला प्रकल्प ‘फुल्ल’
पावसाने ऑगस्ट महिन्यातील बॅटिंगनंतर काहीशी विश्रांती घेतली. २४ ऑगस्टनंतर पुन्हा पावसाने सुरुवात केली. त्यामुळे धरणातील पातळी वाढण्यास मदत झाली. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गेल्या दोन दिवसांपासून धरण परिसरात पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली. गुरुवारी दिवसभरात पानशेत धरणात १४ मिलिमीटर, वरसगावमध्ये १३ मिमी आणि टेमघर धरणात १७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कालपर्यंत टेमघर आणि वरसगाव ही धरणे १०० टक्के भरली होती. मात्र, दोन दिवसांत धरण परिसरात झालेल्या पावसामुळे गुरुवारी खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर ही चारही धरणे ‘फुल्ल’ झाली आहेत. त्यामुळे पुण्याच्या पाण्याची; तसेच शेतीच्या पाण्याची चिंता मिटली. गेल्या वर्षी याच दिवशी २७.४२ टीएमसी म्हणजेच ९४.०७ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. धरणे ‘फुल्ल’ झाल्याने धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
२७ टीएमसी पाणी विसर्ग
खडकवासला प्रकल्पातील दोन धरणे भरल्याने दोन दिवसांपूर्वी किरकोळ स्वरूपात सुरू असलेला विसर्ग बंद केला होता. आता पुन्हा गुरुवारी सायंकाळी धरणे ‘फुल्ल’ झाल्याने टेमघर वगळता अन्य धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत १६ हजार १५९ क्युसेकने खडकवासल्यातून, पानशेतमधून चार हजार २१४ क्युसेक आणि वरसगावमधून चार हजार ३२० क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जून ते आतापर्यंत धरणातून २७.८० अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी सोडण्यात आले आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली.
जिल्ह्यातील धरणेही ‘फुल्ल’
पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणारे पवना धरणही १०० टक्के भरले आहे. पुणे जिल्ह्यातील कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, आंद्रा, वडिवळे, नाझरे, भाटघर, वीर विसापूर; तसेच उजनी धरणही शंभर टक्के भरले आहे. गुंजवणी, नीरा देवघर, डिंभे ही धरणे आता काठोकाठ भरण्याच्या मार्गावर आहेत. नीरा खोऱ्यातील धरणांत ९९.८१ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागाची पाण्याची; तसेच शेतीच्या पाण्याची चिंता मिटली आहे. मुळशीतील टाटाची मुळशी आणि ठोकरवाडी ही दोन धरणे ‘फुल्ल’ झाली आहेत.
धरणसाठा
धरण | पाणीसाठा (टीएमसीमध्ये) | टक्के |
खडकवासला | १.९७ | १०० |
पानशेत | १०.६५ | १०० |
वरसगाव | १२.८२ | १०० |
टेमघर | ३,७१ | १०० |
पवना | ८.५१ | १०० |
चासकमान | ७.५८ | १०० |
भामा आसाखेड | ७.६७ | ३०.८५ |
भाटघर | २३.५० | १०० |
गुंजवणी | ३.६२ | ९८.१६ |
नीरा देवघर | ११.७१ | ९९.७९ |
वीर | ९.४० | १०० |