Nitesh Rane: भाजप आमदार नितेश राणे यांनी केलेल्या भडक वक्तव्यावर एमआयएमचे नेते फारूक शाब्दी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राणे यांच्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आपण त्यांच्याविरुद्ध निवडणूक लढवू असे चॅलेंज शाब्दी यांनी दिले आहे.
मुख्य कार्यालयात जाहीर पत्रकार परिषद घेत राणे पिता-पुत्रावर सडकून टीका केली आहे. यावेळी पत्रकार परिषदेत फारूक शाब्दी,मोहसीन मैनदर्गीकर,अजहर हुंडेकरी,अश्फाक बागवान,पालेखान पठाण,इलियास शेख,गाजी जहागरिदार,राजा बागवान आदी उपस्थित होते.
नितेश राणे यांनी तीन दिवसांअगोदर मशिदीमध्ये घुसून मारू असे चिथावणीखोर भाषण केले होते. नितेश राणेंच्या वक्तव्याला सोलापुरातील एमआयएम नेते फारूक शाब्दी यांनी प्रतिउत्तर दिले आहे. मशिदीमध्ये घुसून मारू म्हणता म्हणजे कुणाच्या बापाचे राज्य आहे का? राणे कुटुंब संपूर्ण महायुतीला घेऊन बुडणार आहे, असे चित्र महाराष्ट्र राज्यात निर्माण झाले आहे. मशिदीमध्ये घुसून मारू, असे वक्तव्य करणारा हिंदू नसून राक्षस आहे.कोणत्याही प्रार्थना स्थळाबाबत असे वक्तव्य करणारा किंवा असे कृत्य करणारा हा राक्षसच असतो अशी संतप्त प्रतिक्रिया फारूक शाब्दी यांनी दिली आहे.
२ सप्टेंबर रोजी अहमदनगरमध्ये महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ आणि बांगलादेशातील हिंदू अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजाकडून मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात बोलताना नितेश राणे यांनी किड्या-मकोड्यासारखे मारू अशा शब्दात धमकी दिली होती. तसेच हा हिंदुंचा देश असून येथे फक्त भगवंतांचे चालेल बाकी कोणाचे नाही. कोणी मस्ती केली तर चून-चून के मारेंगे असे ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर नगरच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. इतकेच नाही तर माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील शिर्डीत कोणी वातावरण बिघडविले तर माझ्याशी गाठ आहे, अशा शब्दात राणे यांचे नाव न घेता भडक भाषणाला विरोध केला होता.