Ladki Bahin Yojana And NCP: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून करण्यात येणाऱ्या लाडकी बहिण योजनेच्या जाहिरातीतून मुख्यमंत्री शब्द वगळ्यानंतर बराच वाद झाला होता. हा मुद्दा मंत्रिमंडळात देखील उपस्थित झाला होता. त्यानंतर राष्ट्रवादीकडून कार्यकर्त्यांना तंबी देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या नावातून मुख्यमंत्री हा शब्दच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहिरातीतून वगळल्याने गुरुवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी झाली. यावरुन आता राष्ट्रवादीच्या शिर्षस्थ नेतृत्वाने कार्यकर्त्यांना तंबी दिली आहे. जन सन्मान यात्रा असो की पक्षाचा कोणताही कार्यक्रम, त्यात योजनेचे नाव झळकावताना त्यात मुख्यमंत्री हा शब्द दिसलाच पाहिजे अशी समज देण्यात आली आहे. निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या असताना महायुतीमध्ये पक्षामुळे काही गैरसमज पसरु नये यासाठी ताकीद देण्यात आल्याचे कळते.
महायुती सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला राज्यभरातून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीनही पक्षांकडून या योजनेची प्रसिध्दी करण्यात येत आहे. त्यातच तीनही पक्षांनीही या योजनेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरु आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरु केलेल्या जन सन्मान यात्रा सुरु केली असून त्यात सरकारच्या योजनांची माहिती देणारे पोस्टर्स लावले जात आहेत.
मात्र, राष्ट्रवादीच्या काही कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या नावातून मुख्यमंत्री हा शब्दच गायब असल्याचे दिसून आले. त्यातच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनीही काही दिवसांपूर्वी बोलताना, या योजनेचे श्रेय राष्ट्रवादीला मिळत असल्याचे वक्तव्य केले होते. यावरुन महायुती सरकारमध्ये खासकरुन, शिवसेना पक्षात कमालीची नाराजी पाहायला मिळत आहे. त्याचे पडसाद गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतही उमटले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
जन सन्मान यात्रेची जिल्ह्यातील नियोजनाची जबाबादारी त्या त्या विभागातील नेतृत्व, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडे असते. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा उल्लेख करताना अनेकदा थोडक्यात बोलावे म्हणून लाडकी बहिण योजना असा केला जातो. पण, त्यात मुख्यमंत्र्यांचे नाव घ्यायचे नाही, असा काही हेतू नव्हता. मात्र, यापुढे योजनेचे नाव पूर्ण लिहावे अशा सूचना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आल्या आहेत, असे पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी स्पष्ट केले. आगामी निवडणूक मुख्यमंत्र्यांच्याच नेतृत्वात लढण्यात येणार असून महायुतीतील घटकपक्षात अंतर राहणार नाही, याची काळजी राष्ट्रवादीकडून आमच्या स्तरावर घेण्यात येईल, असेही पाटील म्हणाले.