Ramdas Kadam on Mahayuti : आम्हाला महायुती टिकवायची आहे, अशी नरमाईची भूमिका घेतानाच, उद्धव ठाकरेंनीच त्यांच्या वडिलांच्या विचारांशी गद्दारी केली, असा टोला रामदास कदम यांनी लगावला.
रामदास कदम काय म्हणाले?
आम्हाला महायुती टिकवायची आहे. गद्दारांची व्याख्या अनेकांना कळली नाही. उद्धव ठाकरेंनीच त्यांच्या वडिलांच्या विचारांशी गद्दारी केली, असा टोला रामदास कदम यांनी लगावला.
आम्हाला सगळ्यांना घेऊन जायचं आहे. आम्हाला आमची महायुती टिकवायची आहे. कुणी चुकलं असेल तर त्यालाही सोबत घेऊन जायचं आहे. गद्दारी आम्ही केली नाही, गद्दारी करण्याचं पाप उद्धव ठाकरेंनी केलं. गद्दारांना सोबत घेण्याचं काम त्यांनी केलं आहे, असं कदम पुढे म्हणाले.
दोन तासात ‘मातोश्री’वर आणतो
ज्यावेळी सगळे आमदार गुवाहाटीला गेले, तेव्हा उद्धव ठाकरेंनी मला फोन केला होता. मी म्हटलं, की उद्धवजी अजूनही वेळ गेली नाही, तुम्ही काँग्रेसला सोडलंय, अशी संध्याकाळपर्यंत किंवा फार फार तर उद्या सकाळपर्यंत पत्रकार परिषद घ्या, गुवाहाटीला गेलेल्या सगळ्या आमदारांना दोन तासात ‘मातोश्री’वर नाही आणलं, तर माझं नाव रामदास कदम नाही, असा किस्सा रामदास कदम यांनी सांगितला. उद्या गणपती बसणार आहेत, गणपतीची शपथ घेऊन सांगतो मी, हे शंभर टक्के खरं आहे, असं बोलायलाही कदम विसरले नाहीत.
Ramdas Kadam on Uddhav Thackeray : ठाकरेंचा मला फोन आलेला, मी म्हटलं उद्धवजी अजूनही वेळ गेली नाही, काँग्रेसला सोडा, रामदास कदम यांचा दावा
महायुतीत ठिणगी
याआधी रामदास कदम यांनी भाजपवर तोंडसुख घेतल्यामुळे महायुतीत ठिणगी पडली होती. चमकोगिरी करणारे कुचकामी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यायला हवा, असा ‘घरचा आहेर’ रामदास कदम यांनी दिला होता. मुंबई गोवा हायवेचं बांधकाम रखडल्याबद्दल संताप व्यक्त करताना कदमांनी निशाणा साधला होता. तर यावर प्रतिक्रिया देताना रवींद्र चव्हाणांनीही कदमांना अडाणी असं संबोधलं आहे. तोंड सांभाळून बोलायचं नाही तर तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच त्यावेळी चव्हाणांनी दिला होता.