Pune PMPML: सायंकाळी पाच वाजता मध्यवर्ती भागातील रस्ते बंद झाल्यानंतर बस मार्गात बदल होणार आहे. ६३ मार्गावरील चार हजार ३९६ फेऱ्यांवर परिणाम होणार आहे.
शिवाजी रस्ता
शिवाजी रस्त्याने येण्यास बंदी केल्यानंतर बस जंगली महाराज रस्ता, बालगंधर्व रंगमंदिर, डेक्कन, संभाजी पुलामार्गे टिळक रस्त्याने स्वारगेट चौकात येऊन पुढे नेहमीच्या मार्गाने जातील. टिळक रस्ता वाहतुकीस बंद झाल्यानंतर या मार्गाच्या बस शास्त्री रोडने दांडेकर पूलमार्गे मित्रमंडळ चौक, लक्ष्मी नारायण चौकात येऊन जातील. मात्र, स्वारगेटहून शिवाजीनगरकडे जाताना बाजीराव रस्ता सुरू असेपर्यंत मार्गात बदल होणार नाही.
मंडई
मंडईकडून सिंहगड रस्त्याकडे जाणाऱ्या बस शनिपार आणि मंडईऐवजी नटराज स्थानकावरून सुटणार आहेत. ५५ क्रमांकाची बस जाता-येता आंबिल ओढा कॉलनी, सेनादत्त पोलिस चौकीमार्गे सुरू राहतील.
पुणे स्टेशन
कोथरूडहून पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गात कोणताही बदल होणार नाही. मात्र, पुणे स्टेशनकडून येताना या मार्गाच्या बस ससून हॉस्पिटल, मालधक्का, जुना बाजार, मनपा भवन बसस्थानक, काँगेस भवन, बालगंधर्व रंगमंदिर, डेक्कन, खंडुजी बाबा चौक येथून पुढे नेहमीच्या मार्गाने जातील. वाहतूक पोलिसांनी लक्ष्मी रस्ता वाहतुकीस बंद केल्यानंतर हा बदल होणार आहे. कोंढवा गेट येथून पुणे स्टेशनकडे येताना (बस क्र. १७४) केळकर रस्त्याने अप्पा बळवंत चौक येथे येऊन पुढे नेहमीच्या मार्गाने लाल महाल येथे येऊन देवजी बाबा मंदिर चौक, गुरुद्वारा रस्त्यामार्गे हमजेखान चौक येथून नेहमीच्या मार्गाने जाणार आहेत. पुणे स्टेशनकडून एनडीए कोंढवा गेटकडे जाताना लक्ष्मी रस्ता वाहतुकीसाठी बंद केल्यास बस नेहमीच्या मार्गाने मॉडर्न बेकरी चौक येथून सेव्हन लव्हज चौकातून स्वारगेट चौकात येतील. स्वारगेट चौकातून नेहरू स्टेडियम, सारसबाग, टिळक रस्त्यामार्गे डेक्कन येथून नेहमीच्या मार्गाने जातील.
गोखलेनगर
गोखलेनगरच्या बस (बस क्रमांक ५८, ५९) रस्ता बंद असताना डेक्कन जिमखान्यावरून सोडण्यात येणार आहेत.
कॅम्प, शेवाळवाडी
डेक्कन, कोथरूडहून कॅम्प, शेवाळवाडीकडे जाणाऱ्या बस रस्ता बंद असताना जाता-येता म्हात्रे पूलमार्गे स्वारगेट शंकरशेठ रस्त्याने सेव्हन लव्हज चौकातून रामोशीगेट, भवानीमाता मंदिर, महात्मा गांधी स्थानकमार्गे पुढे नेहमीच्या मार्गाने जातील. भवानीमाता मंदिराजवळ रस्ता बंद झाल्यास गोळीबार मैदान, महात्मा गांधी स्थानकापासून नेहमीच्या मार्गाने सुरू राहतील.
शास्त्री रस्ता
शास्त्री रस्ता बंद झाल्यास या मार्गाने जाणाऱ्या बस दांडेकर पूल, सेनादत्त पोलिस चौकी, म्हात्रे पूलमार्गे कर्वे रस्ता, डेक्कनवरून नेहमीच्या मार्गाने येता-जाता सुरू राहतील.
न. ता. वाडी ते भेकराईनगर, कोंढव्याकडे जाणाऱ्या बसचा नेहमीचा मार्ग बंद झाल्यास या बस मंगला टॉकीज, सूर्या हॉस्पिटल, कुंभारवाडा, जुना बाजार, लाल देऊळ, वेस्टएंड, जुना पुलगेट, महात्मा गांधी स्टैंडमार्गे पुढे नेहमीच्या मार्गाने जातील.
टिळक रस्ता
टिळक रस्ता बंद झाल्यास त्यामार्गे येणाऱ्या बस शास्त्री रस्ता, दांडेकर पूलमार्गे जातील.
या मार्गांवरील बस बंद
वसंत टॉकीज ते सांगवी आणि पिंपळे गुरवकडील बस मनपा पंप स्थानकापासून संचलनात असतील. शिवाजी रस्ता बंद झाल्यानंतर १७ आणि ५० क्रमांकांच्या बस स्वारगेट स्थानकावरून संचलनात राहतील. ३, ६, ५, २४, २४ अ, २३५, २३६ या मार्गावरील बस रस्ता बंद असेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली.