Ganeshotsav, Maharashtra Politics: मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सवाला आज, शनिवारपासून प्रारंभ होत आहे. यंदा निवडणूकवर्ष असल्याने शनिवारीपासून मुंबईत विशेषत: सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने राजकीय चढाओढ रंगणार आहे. या औचित्यावर बडे नेते मुंबईत हजेरी लावण्याची शक्यता आहे.
मुंबईत दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि आनंदात गणेशोत्सव साजरा केला जातो. या निमित्ताने आर्कषक देखावे, उंच सुबक मूर्ती आणि इतर अनेक माध्यमातून सार्वजनिक मंडळे गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेतात. यात प्रामुख्याने मुंबईतील लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, गणेशगल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, जीएसबी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सह्याद्री क्रीडा मंडळ, वांद्रे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यासारख्या अनेक मोठ्या मंडळांची नावे प्रामुख्याने घेतली जातात. त्याशिवाय गिरगाव, खेतवाडी आणि मुंबईतील इतर सार्वजनिक मंडळांमध्येही गणेशभक्त हजेरी लावत असतात. त्यामुळे या मंडळांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचण्याची सुवर्णसंधी राजकीय पक्षांना असते. तोच योग साधून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या असंख्य उमेदवारांची मुंबईभर सुरू असलेली होर्डिंगबाजी, मंडळांसाठी देणग्या आणि इतर मदत चर्चेत आहे.
दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही केंद्रीय पातळीवरील अनेक दिग्गज नेते मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहिल्या दिवसांपासून येण्याची शक्यता आहे. शहा,नड्डा, अनेक मंत्री येत्या दोन दिवसांत मुंबईत येण्याची शक्यता आहे. त्याशिवाय राज्यातील अनेक राजकीय पक्षांचे अनेक बडे नेते सार्वजनिक मंडळांच्या गणरायाच्या दर्शनासाठी विविध मंडळांना भेट देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.