Nandurbar ST Bus News : नंदुरबारमधून कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी बसेस सोडण्यात आल्या आहेत. मात्र या एसटीची अवस्था खराब असून बसच्या गळक्या छताखाली उभं राहून प्रवाशांना प्रवास करावा लागतो आहे.
Nandurbar News : गळकं छत, डोक्यावर छत्री; गणेशोत्सवात भक्तांसाठी एसटी बस सोडल्या, पण…; प्रवाशांना मनस्ताप
तळोदा येथील बस स्थानकात दुपारच्या सुमारास एसटी बस (क्र.एमएच २० बीएल ३१२४) ही प्रवासी घेऊन नंदुरबारकडे निघाली होती. बसमध्ये बरेच प्रवासी होते. या प्रवासादरम्यान तळोदा ते नंदुरबार रस्त्याने मार्गस्थ होत असताना पावसाची रिमझिम सुरू होती. त्यात बसच्या पुढील सीटवर बसलेल्या प्रवाशाच्या अंगावर पाणी पडत होतं. त्यामुळे या प्रवाशाला एसटी बसमध्ये छत्री उघडून बसून प्रवास करावा लागला. बसमध्ये बसायला जागा मिळाली, परंतु एसटीच्या टपावरील गळतीने हातात छत्री घेऊनच प्रवाशाला बसावं लागलं.
संपूर्ण बसमध्ये सीट रिकाम्या होत्या, बसचं छत गळत असल्याने प्रवाशांना उभं राहून छत्रीचा आधार घेत प्रवास करावा लागला. वाहक महिलेने देखील छत्रीचा आधार घेत तिकीट फाडत आपलं काम केलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एसटी महामंडळाच्या अनेक बसेसची अशी अवस्था असल्याने पावसाळ्यात त्या बससेंना गळती लागल्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. राज्यपरिवहन महामंडळाने एसटी बसेसची दुरुस्ती करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील एसटी बस कोकणात…
कोकणात गणेशोत्सव मोठा उत्साहात साजरा होतो. त्यामुळे चाकरमान्यांना गावाकडे जाण्यासाठी विविध आगारातून बसेस मागवण्यात येतात. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील विविध आजारातून देखील बसेस कोकणाकडे रवाना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील या बसेस लांब पल्यासाठी सोडण्यात येतात. मात्र या बसेस नादुरुस्त असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. काही बसेसच्या खिडक्या तुटलेल्या, तर काहींच्या काचा गायब अशा अनेक नादुरुस्त बसेसमुळे प्रवाशांना मनस्ताप करावा लागत आहे.