Satara Accident News: अचानक घडलेल्या घटनेमुळे पुलाच्या खाली आणि समोर असलेल्या एसटी स्टँडच्या आजूबाजूला असलेले नागरिक, प्रवासी गोंधळले.
हायलाइट्स:
- कोल्हापूरला दुचाकीवरून निघालेले
- दाम्पत्य उड्डाण पुलावरून कोसळले
- पती जागीच ठार, तर पत्नी गंभीर जखमी
चारचाकी वाहनाने हुलकावणी दिली
घटनास्थळी आणि पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी वाढली आहे. पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने उपेंद्र चाटे आणि उन्नती चाटे (रा. कोल्हापूर) हे दोघे पती-पत्नी दुचाकीवरून सकाळी निघाले होते. ते खंडाळा पारगाव येथे उड्डाण पुलावर आले असता महामार्गावर चारचाकी वाहनाने हुलकावणी दिली. या घटनेत दाम्पत्याची गाडी रस्त्यावरच राहिली असून, अर्जंट ब्रेक लागल्याने त्यांचा तोल जाऊन उड्डाण पुलावरून ७० फूट खाली कोसळले. दोघेही खाली पडल्याने पतीचा मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे.
नागरिकांमध्ये हळहळ
अचानक घडलेल्या घटनेमुळे पुलाच्या खाली आणि समोर असलेल्या एसटी स्टँडच्या आजूबाजूला असलेले नागरिक, प्रवासी गोंधळले. घटनेचे गांभीर्य लक्षात येताच स्थानिकांच्या मदतीने दोघांना रुग्णालयात दाखल केले असता उपेंद्र चाटे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले, तर उन्नती चाटे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना साताऱ्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ऐन सणादिवशीच घडलेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत होती.