Konkan Ganesh Utsav : लोककला प्रकारातील जाखडीचा ठेका आणि भजनाचा सूर आता कोकणातील प्रत्येक वाडीतून येवू लागला आहे. गणेशोत्सवाच्या काळात घरोघरी पेटी, पखवाज, टाळ, मृदुंग यांचे सूर घुमू लागले आहेत.
गणेश वंदनेबरोबरच आराध्य दैवतांच्या आख्यायिकाना गाण्यांचा, भजनाचा साज चढवत ही कला सादर केली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भजन परंपरेला प्रत्येक घरात वाडीत आगळे वेगळे महत्त्व आहे. संध्याकाळी चार वाजता सुरू झालेली भजने दुसऱ्या दिवशीची पहाटे पाच वाजेपर्यंत चालतात. मुंबई परळ येथे वास्तव्यास असलेले मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ माणगाव येथील प्रमोद धुरी यांनी यापूर्वी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या प्रश्नावर भजन सादर केलं. गणेशोत्सवासाठी धुरी कोकणात दाखल झाले आहेत. कोकणातील भजन, दशावतार परंपरा कायम अबाधित ठेवणाऱ्या कलाकारांबद्दल आणि कोकणच्या निर्मितीची महती सांगणार भजन धुरीबुवांनी लिहिले आहे. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंभे स्वामी प्रासादिक भजन मंडळाचे धुरी यांनी ‘आघात कीर्ती श्री नारायण.. झाला, परशुराम अवतार… क्रोधाने तो बाण सोडून हटविला सागर तेथे घडला हो कोकण…’ हे भजन यावर्षी लिहिल्याचं त्यांनी महाराष्ट्र टाइम्स जवळ बोलताना सांगितलं.
Ganesh Utsav : लोककलेची पुन्हा पडली भुरळ! कोकणात घुमू लागले जाखडीचे नृत्य अन् भजनाचे सूर
गेली चाळीसवर्ष या क्षेत्रात काम करत असताना आतापर्यंत या कलेसाठी असंख्य गाणी लिहिणारे सादर करणारे दापोली टेटवली येथील शंकर विठ्ठल भारदे सांगतात जाखडी म्हणजेच याला शक्तीवाले तुरेवाले याचच रूप म्हणजे जाखडी. त्यांनी लिहिलेले बापाची वेदना सांगणार गाणं महाराष्ट्रात प्रसिद्ध झालं यावर्षी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची वेदना गणपती बाप्पाला सांगणारे आहे… ‘यावर्षी येताना तुम्ही गणराया कोकणातील खड्ड्यांच्या रस्त्याने जपून हळूहळू या…’ हे गाणं त्यांनी रचले आहे. जाखडी आणि भजन हे कोकणातील दोन्ही कला प्रकारांना प्रोत्साहन मिळावं यासाठी कोकणात, मुंबईत आणि उर्वरित महाराष्ट्रातही स्पर्धा कार्यक्रमाचेही आयोजन केले जातं. जाखडी कला प्रकारात आता स्त्रियाही ही कला सादर करतात. स्त्री म्हणजे देवीचे आदिशक्तीचे रूप म्हणून ती ‘शक्ती’ आणि ‘तुरेवाले’ म्हणजे पुरुष अस त्याचं स्वरूप असल्याचे भारदे यांनी महाराष्ट्र टाइम्स जवळ बोलताना सांगितले आहे. मुंबईकर गणेशोत्सवाला अगदी न चुकता हजेरी लावतात बॉस ने रजा न दिल्यास प्रसंगी नोकरीवरही पाणी सोडण्याची तयारी असते. पण गणपती बाप्पाला आराध्य दैवत कोकण वर्षीय सध्या मुंबईतून घराघरात दाखल झाले आहेत.