Chandrapur Youth Missing: एक मुलगा कॉलेजला जायचं सांगून घरातून निघाला तो परतलाच नाही. रात्री उशीर झाल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरु केला. तेव्हा एका नदीच्या पुलावर त्याची बाइक आणि चप्पल आढळून आली.
कॉलेजला जातो सांगून निघाला तो परतलाच नाही
याप्रकरणी मिळेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथून ३० कि. मी. अंतरावर असलेल्या हळदा या गावातील समीर राऊत हा युवक आरमोरी येथील कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. गुरुवारला कॉलेजमध्ये जातो, असे कुटुंबीयांना सांगून तो घरातून बाहेर पडला. नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकीने तो आरमोरीला निघाला होता. मात्र, रात्री उशीर होऊनही तो घरी परत आला नाही. मुलगा घरी न आल्याने कुटुंबीयांनी परिसरात त्याची शोधाशोध केली. त्याच्या मित्रांकडून त्याची माहिती काढली. मात्र, तो कुठे गेला हे कोणालाच माहिती नव्हतं, त्याचा कुठेच पत्ता लागला नाही.
नदी पुलावर गाडी आणि चप्पल, पाहून कुटुंबीय हादरले
तेव्हा समीरला शोधत असताना त्याचा नातेवाईकांना ब्रह्मपुरी-आरमोरी मार्गावरील वैनगंगा नदी पुलावर त्याची दुचाकी आणि चप्पल आढळली आली. हे पाहून कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याचं कुटुंब हादरलं. त्यानंतर कुटुंबीयांनी थेट ब्रह्मपुरी पोलिस स्टेशन गाठलं आणि समीर बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
Chandrapur News: कॉलेजचं सांगून घरातून निघाला, तो परतलाच नाही, मग नदीच्या पुलावर बाइक अन् चप्पल, कुटुंब हादरलं
तक्रारीवरून ब्रम्हपुरी पोलिसांनी शुक्रवारी पथक तयार करून नदी पात्राची पाहणी केली. पण समीरचा शोध लागलेला नाही.शनिवारी देखील पोलिसांचे पथक दिवसभर नदी काठावर शोध घेत होते. मात्र पोलिसांना समीरचा शोध लागलेला नाही. पुलावर चप्पल आणि दुचाकी आढळून आल्याने त्याने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला गेला असला तरी अद्याप पोलिसांच्या हाती काहीच लागलं नसल्याने समीर नेमका गेला कुठे हा प्रश्न कुटुंबीयांना आणि पोलिसांना पडलेला आहे.