Gondia Two Kids Fell In Drain: खेळत असताना पाय घसरुन दोन चिमुकले नाल्याच्या वाहत्या पाण्यात पडले. या घटनेत चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेने गोंदियात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोंगेझरा येथील देवस्थानाच्या बाजूने एक नाला वाहतो. त्या नाल्यावर एक पूल आहे. पुलाची उंची कमी असल्यामुळे पावसाळ्यात नेहमीच त्यावरुन पाणी वाहत असते. या देवस्थानातील पुजारी सुजित दुबे हे तिथेच राहतात. मृतक रुद्र आणि शिवम ही सुजित यांची मुले आहेत. शुक्रवारी सायंकाळी रुद्र आणि शिवम खेळता खेळता या पुलावर पोहोचले. पुलाच्या मध्यभागी पाण्यात खेळताना चिमुकल्यांचा पाय घसरल्याने दोघेही नाल्यात पडून वाहून गेले.
दुबे यांनी शुक्रवारी रात्री गोरेगाव पोलिसांत मुले हरविल्याची तक्रार दाखल केली. बऱ्याच ठिकाणी शोधाशोध केल्यानंतरही दोघे चिमुकले सापडले नाही. शनिवारी शोधकार्य सुरू असताना दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह पोंगेझरा हिरडामालीच्या जवळ असलेल्या नाल्यात तरंगताना आढळले. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
सूर नदीत दोन मुले बुडाली
नागपुरातील महादुला गावातील दोन मुले शनिवारी सूर नदीत बुडाली. वृषभ राजेंद्र गाडगे आणि रोहन सुभाष सौसाखडे (वय अंदाजे १३ वर्षे) अशी दोघांची नावे आहेत. वृषभ आणि रोहन हे महादुला येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज विद्यालयात इयत्ता आठवीचे विद्यार्थी होत. हे दोघेही शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास पोहण्यासाठी सूर नदीवर गेले. नदीत उड्या मारताच त्यातील एक जण बुडू लागला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दुसरासुद्धा पाण्यात बुडाला. ही माहिती मिळताच पोलिस आणि गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. राज्य आपत्ती निवारण दलाच्या जवानांनीसुद्धा त्यांचा शोध घेतला. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्यांचे मृतदेह सापडले नव्हते. अंधारामुळे सायंकाळी शोधमोहीम थांबविण्यात आली.