gautami patil in kolhapur : आज राशिवडे गावात सावकार गणपतीच्या महाआरतीसाठी गौतमी पाटील दाखल झाली आणि तिला पाहण्यासाठी गावात मोठी गर्दी झाली. यामुळे पोलीस प्रशासनाची एकच तारांबळ उडालेली दिसून आली.
आपल्या नृत्याने लाखो लोकांना भुरळ घालणारी मराठमोळी नृत्यांगणा गौतमी पाटील आणि तिने उपस्थिती लावलेल्या कार्यक्रमात उडणारा गोंधळ हे एक समीकरण बनला आहे. गेल्यावर्षी देखील कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील नंदगाव आणि राधानगरीतील राशिवडे येथे नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे काही तरुण मंडळांनी आयोजन केले होते. मात्र पोलीस अधीक्षकांनी गणपतीच्या बंदोबस्तात पोलीस व्यस्त असल्याने आणि गौतमी पाटील कार्यक्रमात आल्याने कायदा व सुव्यवस्था बिघडेल या अनुषंगाने गौतमीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. यामुळे तिला या दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित राहता आले नाही.
शनिवारी बाप्पाचे मोठ्या जल्लोषात स्वागत झाले आहे. गेल्यावर्षी राशिवडे येथील सावकार गणपती मंडळाने विसर्जन मिरवणुकीसाठी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव गौतमी पाटीलवर प्रशासनाने बंदी घातल्याने ती उपस्थित राहीली नव्हती. यानंतर यंदा सावकार गणपतीच्या महाआरतीला गौतमी पाटलाला बोलवायचं हे काल शनिवारी सायंकाळी ठरलं आणि लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज रविवारी कोल्हापुरातील राशीवडे गावातलतील सावकार गणपतीच्या महारतीसाठी गौतमी पाटील दाखल झाली. तब्बल एक वर्षांनंतर गौतमी पाटील पहिल्यांदाच कोल्हापूर जिल्ह्यात महाआरतीसाठी उपस्थित राहीली. गौतमी पाटीलचा सत्कार करण्यासाठी मंडळाने भव्य स्टेज आणि साऊंड सिस्टीम ही उभारण्यात आले होते.
गौतमी येणार म्हणून लोकांची गर्दी
गौतमी पाटील येणार ही माहिती रात्रीतून आणि सकाळी सोशल मीडियावरून अनेकांपर्यंत पोहोचली आणि यानंतर गौतमी पाटीलला पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी सकाळपासून रशिवडे मध्ये होऊ लागली. ही माहिती पोलिसांना मिळताच पोलीस प्रशासनाची मात्र रविवारी सकाळी तारांबळ उडाली. तरुणाईची गर्दी पाहून गावात पोलीस प्रशासनाने तत्काळ बंदोबस्त तैनात केला. दुपारी एक वाजता महाआरतीसाठी गौतमी पाटीलचे आगमन झाले. यानंतर तिचे मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी तिचे स्वागत केले. त्यानंतर तिच्या हस्ते गणपतीची महाआरती करण्यात आली. यानंतर गौतमी पाटीलने जमलेल्या महीलांशी संवाद साधला. याचवेळी काही महिलांनी तिला फुगडी खेळण्याचा आग्रह केला असता तिने महिलांसोबत फुगडी ही खेळली. यानंतर तिचा सत्कार करण्यात येणार होती. तिला पाहण्यासाठी उसळलेली गर्दी आणि सुरक्षेचे कारण देत सत्कार करण्यासाठी प्रशासनाने थेट परवानगी नाकारली. मात्र गर्दी आटोक्यात आणताना पोलीस प्रशासनाची मात्र चांगलीच दमछाक झालेली दिसून आली.