Pune Man threatens BJP MLA Mahesh Landge : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला फोन करत भाजप आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची सुपारी मिळाल्याची धमकी आरोपीने दिली
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षाला फोन आला होता. यावेळी भाजप आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची सुपारी मिळाल्याची धमकी देण्यात आली होती. शनिवारी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला.
कोण आहे आरोपी उदयकुमार रॉय?
धमकी देणाऱ्या उदयकुमार रॉय याला (वय २७ वर्ष, रा. मोशी, मूळ छत्तीसगड ) पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आरोपी उदयकुमार रॉय हा सीएनसी ऑपरेटर असून तो भोसरी एमआयडीसी येथील एका कंपनीत काम करत आहे. गेल्या पाच वर्षांपासून उदयकुमार रॉय हा मोशी येथे वास्तव्यास आहे.
शनिवारी उदयकुमार रॉय याने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षात फोन केला होता. ‘मला महेश लांडगे यांना मारण्याची सुपारी मिळाली असून, मी त्यांना मारणार आहे’ असं आरोपीने सांगितलं होतं. मात्र दारुच्या नशेत त्याने हा फोन केला असल्याचे आरोपी उदयकुमार रॉय याने सांगितलं. या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद दाखल झाली आहे.
Mahesh Landge : भाजप आमदार महेश लांडगेंना जीवे मारण्याची सुपारी मिळालेय, पोलीस आयुक्तालयात फोन, २७ वर्षीय तरुण ताब्यात
कोण आहेत महेश लांडगे?
महेश लांडगे यांनी २००२ मध्ये नगरसेवकपदाची पहिली निवडणूक लढवली, पण त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर पोटनिवडणूक लढवत २००४ मध्ये ते पहिल्यांदा नगरसेवक झाले. पिंपरी चिंचवड महापालिकेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सलग तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले.
२०१४ मध्ये राष्ट्रवादीने त्यांना भोसरी विधानसभा मतदारसंघाचे तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी बंडखोरी करून स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. त्यांनी निवडणूक जिंकली आणि नंतर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. २०१९ मध्ये ते भोसरी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून दुसऱ्यांदा विजयी झाले. आता ते पुनरावृत्ती करण्याची शक्यता आहे.