Pratibha Dhanorkar Kunabi Adhiveshan Speech : ब्रह्मपुरी आणि गडचिरोली मतदारसंघात अल्पसंख्याक समाजाचे लोक आपले प्रतिनिधित्व करत आहेत, ही परंपरा बदलली पाहिजे, असं जाहीर वक्तव्य प्रतिभा धानोरकर यांनी केलं.
चंद्रपूरची खासदारकी भूषवत असताना बाळू धानोरकर यांचं काही महिन्यांपूर्वी निधन झालं. त्यानंतर लोकसभा निवडणुकांना अवघे काही महिने असल्याने पोटनिवडणूक झाली नाही. त्यावेळी आमदारकी भूषवत असलेल्या त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना लोकसभेचं तिकीट देण्याची मागणी एका गटातून झाली. परंतु दुसरीकडे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना शिवानी वडेट्टीवार यांच्यासाठी चंद्रपुरात उमेदवारी हवी होती. त्यामुळे दिल्लीत तळ ठोकून होते. परंतु पारडं प्रतिभा धानोरकरांच्या बाजूने झुकलं आणि त्यांना तिकीट जाहीर झालं.
प्रतिभा धानोरकर यांचा मोठा मताधिक्क्याने विजय झाला आणि त्या खासदारपदी विराजमान झाल्या. या निवडणुकीत कुणबी समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. त्यांच्या विजयात अल्पसंख्याक आणि दलित समाजाचा मोठा वाटा आहे.
विजय वडेट्टीवार हे अनेक वर्ष ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचं प्रतिनिधित्व करत आहेत. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या तर्फे ब्रह्मपुरी शहरात कुणबी समाजाचे महाअधिवेशन आयोजित करण्यात आले होते. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासोबतच भाजप आमदार परिणय फुके यांची देखील मंचावर उपस्थिती होती.
Pratibha Dhanorkar : अल्पसंख्याकांना प्रतिनिधित्व देण्याची परंपरा बदला, प्रतिभा धानोरकरांचा वडेट्टीवारांना अप्रत्यक्ष इशारा
गेली काही वर्षे ब्रह्मपुरी आणि गडचिरोलीत आपल्यावर अल्पसंख्याक समाजाचे लोक प्रतिनिधित्व करत आहेत. ही परंपरा बदलली पाहिजे, असे मत यावेळी प्रतिभा धानोरकर यांनी भाषणातून व्यक्त केले. कुणबी समाज काही राजकारणी लोकांच्या भूलथापांना बळी पडून मॅनेज होतो. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत हे बदला असे आवाहन त्यांनी केले.
भाजप आमदार परिणय फुके यांनी देखील आपण भाजपच्या पक्षश्रेष्ठींना या मतदारसंघातून कुणबी चेहऱ्याला तिकीट द्यावे यासाठी गळ घालणार असल्याचे म्हटले. मात्र प्रतिभा धानोरकरांचा या वक्तव्यामुळे अल्पसंख्याक समाजातून नाराजीचा सूर उमटत आहे. चंद्रपूरसारख्या मोठ्या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व त्या करतात. या मतदारसंघात सर्व जाती-धर्माचे लोक आहेत. अशात धानोरकर यांनी केलेलं वक्तव्य काँग्रेसच्या विचारसरणीला मारक ठरणारे असल्याच्या प्रतिक्रिया आता राजकीय वर्तुळातून उमटत आहेत.