Pune Drunk And Drive: पुण्यात अपघातांचे सत्र काही थांबायचं नाव घेत नाहीये. पुण्यात पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. येथे एका मद्यपी चालकाने पाच वाहनांना धडक दिली. यावेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्याच्या पत्नीलाही वाहनाची धडक बसली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे.
अपघातात मनसे पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा मृत्यू
गीतांजली अमराळे, असे मृत झालेल्या महिलेचे नाव असून त्या मनसेचे पदाधिकारी श्रीकांत अमराळे यांच्या पत्नी आहेत. श्रीकांत अमराळे आणि गीतांजली अमराळे हे रस्त्यावर उभे असताना मद्यपी चालकाने त्यांना जोरदार धडक दिली. पिकपचे चाक गीतांजली अमराळे यांच्या अंगावरून गेल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. तर श्रीकांत अमराळे देखील यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत.
आशिष पवार असे मद्यधुंद चालकाचे नाव असून स्थानिक नागरिकांनी त्याला पकडून चांगला चोप दिला आहे. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पौड फाटा रस्त्यावर रविवारी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, रविवारी रात्री अकराच्या सुमारास पौड रस्त्यावरून एक पिकप चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता. या मद्यपी चालकाने रस्त्यावरून जाणाऱ्या चार ते पाच वाहनांना धडक दिली. यात एक चार चाकी, तीन दुचाकी आणि एका रिक्षाचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. घटना घडल्यानंतर मद्यपी चालकाला स्थानिक नागरिकांनी पकडून चांगला चोप दिला आहे. त्यानंतर त्याला अलंकार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
Pune Accident: मद्यपी चालक भरधाव वेगात आला अन् चाक अंगावर घातलं, पुण्यात मनसे पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा मृत्यू
पुण्यामध्ये ड्रंक अँड ड्राइव्हच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये काही वेळ गर्दी जमली होती. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.