Ajit Pawar: हृदयपरिवर्तन झालेले पाहून आनंद, अजित पवारांनी पक्ष परत करावा; शरद पवार गटाच्या नेत्याचं आवाहन

Ajit Pawar And Sharad Pawar: अजित पवार म्हणाले की राजकारणामुळे घरात फूट पडू नये, जर त्यांचं हृदयपरिवर्तन झालं असेल तर आम्हाला आनंदच आहे, आता त्यांना खरंच पश्चाताप झाला असेल तर त्यांनी राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांना परत करावा.

महाराष्ट्र टाइम्स
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: ‘राजकारणामुळे घरात फूट पडू देऊ नका,’ या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने टीका केली आहे. ‘अजित पवार यांचे हृदयपरिवर्तन झाले असेल आणि ते इतरांना असे सल्ले देत असतील तर त्यांनी आधी शरद पवार यांचा पक्ष परत करावा,’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून देण्यात आली. तर, ‘अजित पवार उमद्या मनाने चूक स्वीकारत बोलले; परंतु त्याचा वेगळा अर्थ काढून संकुचित मनाने टीका करू नये,’ असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा गडचिरोली येथे असताना पक्षाचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्येने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीवर टीकाटिप्पणी झाली. आत्राम यांनी याविषयी कडाडून टीका करून त्याला विरोध केला. त्यावर भाष्य करताना अजित पवार यांनी राजकारणामुळे घरात फूट पडू देऊ नका, मी अशी चूक केली तुम्ही करू नका, असे वक्तव्य केले होते.

‘अजित पवार यांचे हृदयपरिवर्तन झालेले पाहून आम्हाला आनंद झाला आहे; परंतु हे परिवर्तन कृतीत उतरणे महत्त्वाचे आहे,’ असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे म्हणाले. ‘अजित पवार यांना खरेच पश्चात्ताप झाला असेल आणि इतरांना ते राजकारणामुळे घरात फूट पडू देऊ नका, असे सल्ले देत असतील तर त्यांनी सर्वप्रथम शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांना सुपूर्द केला पाहिजे. वर्षानुवर्षे घडविलेले नेते, कार्यकर्ते अजित पवार यांनी पळवले. अजित यांना खरेच मनापासून असे वाटत असेल तर त्यांनी कृतीतून ते दाखवून द्यावे,’ असे आवाहन तपासे यांनी केले.

Ajit Pawar: हृदयपरिवर्तन झालेले पाहून आनंद, अजित पवारांनी पक्ष परत करावा; शरद पवार गटाच्या नेत्याचं आवाहन

‘चूक मान्य करणारा एकमेव नेता’

‘घरात राजकारण इतके शिरू नये की त्याने घर फुटावे,’ असे वक्तव्य अजित पवार यांनी केले होते. ‘सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उमेदवारी द्यायला नको होती, असे त्यांनी उमद्या मनाने मान्यही केले. आपले कितीही चुकले तरी त्याचे रेटून समर्थन करणारे अनेक नेते या राज्याने पाहिले; परंतु सार्वजनिक जीवनात काम करताना आपल्याकडून चूक झाली हे इतक्या मोकळेपणाने बोलणारा एकमेव नेता राज्याला मिळाला आहे. तरीही राज्यात काही लोक संकुचित वृत्तीचे असल्याने त्यावर टीका करत आहेत. अजित पवार जे पोटात असते तेच बोलतात, त्यामुळे त्याचा वेगळा अर्थ काढू नये,’ असेही राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले.

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

ajit pawar ncpajit pawar vs sharad pawarBaramatiMahesh Tapasemarathi batmyaNCP partyअजित पवार राष्ट्रवादी पक्षअजित पवार शरद पवारअजित पवारांना पश्चातापमहायुती
Comments (0)
Add Comment