maharashtra election 2024 : समरजितसिंह घाटगे यांनी नुकताच राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. घाटगे यांच्या पक्ष प्रवेशामुळे भाजपचे मोठं नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे अजित पवारांचे टेन्शन वाढवलं आहे. परंतु आता याच लढतीत मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. कारण कागल विधानसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटना आपला उमेदवार देणार आहे.
सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या नेतृत्वाची गरज
राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात कागल विधासभा मतदारसंघातील गोरंबे गावात कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात राजू शेट्टी म्हणाले की, ” कागल विधासभा मतदारसंघामध्ये सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे. विधानसभेत आपल्या हक्काचा प्रतिनिधी असणे गरजेचे आहे. यासाठी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी करावी. आणि विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी सज्ज व्हावं”.
अन्यथा आम्ही आंदोलन पुकारणार
राजू शेट्टी यांनी उस उत्पादकांचे मागील हप्त्यातील पैसे न मिळाल्यामुळे संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे आगामी काळात आंदोलनाचे हत्यार उपसून मतदारसंघात ताकद निर्माण करण्याचा राजू शेट्टी यांचा प्रयत्न आहे. कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ, माजी खासदार संजय मंडलिक आणि समरजितसिंह घाटगे यांचे साखर कारखाने आहेत.
दरम्यान, कागलमध्ये राजू शेट्टी यांना मानणारा वर्ग मोठा आहे. या मतदारसंघातील 127 गावांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत. याचा फायदा त्यांना नक्की होऊ शकतो. दुसरीकडे शरद पवार यांनी समरजितसिंह घाटगे यांना पक्षात घेऊन मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात मोठा डाव टाकला आहे. समरजित घाटगे यांच्या जाण्याने कोल्हापुरात भाजपची ताकद कमी झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत कागल विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाचे आमदार मंत्री हसन मुश्रीफ यांना संधी दिली जाणार आहे. यामुळेच घाटगे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता कागलचे मैदान कोण मारणार? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.